पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. याठिकाणी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे विजयी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले जिल्ह्यातील ते एकमेव उमेदवार आहेत.

पारोळा एरंडोल हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. पारोळा नगराध्यक्ष भाजपचा असून भाजपची ताकद ही पारोळ्यात आहे. एरंडोल येथेही भाजपा कार्यकर्ते सक्रिय असून केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या कार्यकाळातील कामकाजामुळे भाजपकडे झुकणारा एक वर्ग येथे आहे. माजी खासदार ए.टी. पाटील यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने ते सध्या शिवसेना-भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. यावेळी एरंडोलमध्ये त्यांची काय भूमिका राहील हे देखील पाहण्यासारखं आहे.

या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. असं असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने येथे विजय मिळवला आहे. येथे चिमणराव पाटील यांनी मागील लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश पाटील यांच्याशी विजयासाठी संघर्ष केला होता. या मतदारसंघात राज्यातील सत्तेच्या विरोधात आमदार देण्याची परंपरा असून आमदार सातत्याने बदलत असतो. चिमणराव पाटील आजही शिवसेनेतर्फे उमेदवारीसाठी मजबूत दावेदार असून शिवसेनेकडे दुसरा उमेदवार आज चर्चेत नाही.

मागील निवडणुकीत मोदी लाटेत अनेक आमदार भुईसपाट होत असताना जिल्ह्यात विरोधी पक्षातील एकमेव डॉ. सतीश पाटील निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे आ. सतीश पाटील हे आजही मजबूत दावेदार असून इतर उमेदवाराची चर्चा नाही. नदीजोड प्रकल्प आणि पालकमंत्री असताना केलेली कामे यामुळे सतीश पाटील यांची एक स्वतःची अशी एक प्रतिमा जनतेत आहे. त्यामुळे सतीश पाटील हे आजही लोकप्रिय उमेदवार मानले जातात. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार वसंतराव मोरे हे देखील असून पक्ष संघटनेत त्यांचे मोठे योगदान असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत आहे.

मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांना इव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, जर पुन्हा निवडून आलो नाही तर वडिलांचे नाव लावणार नाही असं त्यांनी खुलं आव्हान दिलं आहे. त्यांची ही भीष्म प्रतिज्ञा या मतदारसंघात चर्चेची ठरली आहे. गिरीश महाजन यांनीदेखील त्यांचे आव्हान स्वीकारले असून यावेळी डॉ. सतीश  पाटील यांचा पराभव निश्चित असल्याचं म्हटलं आहे. दोघांच्या आव्हान प्रतिआव्हानात आता कोण बाजी मारतो याकडे मतदार संघाचे लक्ष लागून आहे.

कॉंग्रेस पक्ष या मतदारसंघात अस्तित्वहीन असून या ठिकाणी कार्यकर्त्यांची वानवा आहे. एरंडोल येथे महेंद्रसिंग पाटील हे कॉंग्रेसचे नेते असले तरीही कॉंग्रेसची ताकद कमी आहे.

डॉ.सतीश भास्कर पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – ५३,७२६
चिमणराव पाटील (शिवसेना) – ५१,४३७
डॉ.सतीश पाटील २२८९ मताधिक्याने विजयी