परभणी : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी परभणीतील लढतीचं चित्र हे स्पष्ट झालं. परभणीत ना युती ना आघाडी झाल्याचं स्पष्ट झालं. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांना घेऊन निवडणूक लढवत आहेत. यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे, 54 पैकी 54 जागांवर एकाही पक्षाला उमेदवार उभे करता आले नाहीत. जिल्ह्यात भाजप सर्वाधिक जागा लढवत आहे.

Continues below advertisement

परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि पंचायत समितीच्या 108 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले आहेत. यानंतर जिल्ह्यातील लढतीचे चित्र आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त दोन जागांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. काँग्रेस आणि रासपने काही ठिकाणी आघाडी केली आहे. बाकी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवताना दिसत आहेत. 

Continues below advertisement

ठाकरेंची शिवसेना स्वबळावर

ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय जाधव हे जिल्हा परिषद निवडणुकीचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी 20 ठिकाणी स्वबळावर उमेदवार दिले आहेत. तर पिंगळी आणि वालूर या दोन जागेवर उमेदवार पुरस्कृत केले आहेत. 

काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह इतर नेत्यांची फळी ही निवडणुकीचे नेतृत्व करत आहेत. काँग्रेसने 18 ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार उभे केले आहेत, तर 32 ठिकाणी पंचायत समितीसाठी उमेदवार दिलेत. त्यांनी काही ठिकाणी रासप सोबत आघाडी केली आहे. 

भाजप सर्वाधिक जागा लढवणार

भाजपकडून सर्वाधिक 50 जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत, तर पंचायत समितीच्या ही 102 जागा लढवण्यात येत आहेत. भाजपामध्ये निवडणुकीचे नेतृत्व हे पालकमंत्री मेघना बोर्डीकर त्याचबरोबर माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी हे करत आहेत. भाजपने यंदा जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर ताकद लावली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणीमध्ये निवडणुका लढवल्या जात आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेने परभणी विधानसभेमध्ये दोन ठिकाणी भाजपसोबत युती केली. परभणी आणि जिंतूर विधानसभेत जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी पाच ठिकाणी उमेदवार दिले आले आहेत. तर दोन ठिकाणी पुरस्कृत उमेदवार करण्यात आले आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हाप्रमुख सईद खान यांच्या नेतृत्वाखाली 16 जागा शिवसेना लढत आहे. अशा एकूण 26 जागांवर शिंदे सेना लढत आहे. 

राष्ट्रवादीचा जोर 

अजित पवारांची राष्ट्रवादी ही जिल्ह्यामध्ये जोरदारपणे निवडणूक लढवत आहे. जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर तसेच जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यासह इतर नेतेही या निवडणुकीमध्ये जोरदार ताकद लावत आहेत. राष्ट्रवादीने जिल्ह्यामध्ये 45 जिल्हा परिषद आणि 88 पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उतरवले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने ही 12 ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत.

तिकडे इकडे वंचित बहुजन आघाडीनेही अनेक ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवले आहेत. तसेच काही अपक्ष ही आपलं नशीब आजमावत आहेत. एकूणच परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष जवळपास स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे कोण सत्ता मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ही बातमी वाचा: