Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस संविधान बदलणार असल्याचा विषारी प्रचार करीत आहे. संविधानाचे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्वे कुणीही बदलू शकत नाही. मात्र स्वतः च्या सोईकरिता काँग्रेसने संविधानाच्या धज्जीया उडविल्या आहेत. त्यामुळे उलटा चोर कोतवाल को दाटे, असा प्रकार काँग्रेसचा (Congress) असल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यवतमाळच्या राळेगाव येथील सभेत केली. भाजप उमेदवार अशोक उईके याच्या प्रचारार्थ सभेत गडकरी बोलत होते. 


काँग्रेस मुसलमानांना देखील खोट्या प्रचारातून भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी बोलतांना केले. काँग्रेसवाले म्हणत आहे संविधान बदलणार आहे. मात्र घटनेचे मूलभूत तत्त्व मुळात कोणी बदलू शकत नाही. असे असले तरी घटनेची खरी मोडतोड 1975 मध्ये  आणीबाणीच्या काळात काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने संविधान तोडले आणि ते आता आरोप करत फिरत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे, असे झाले आहे. सबका साथ सबका विश्वास असे महायुतीचे सरकार आहे. भाकरी बदलली उईके यांना निवडणून दिले आणि बदल झाला. राळेगावच्या विकासाकरिता उईके यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे म्हणत यवतमाळच्या राळेगाव येथील सभेत नितीन गडकरी यांनी मतदारांना साद घातली आहे. 


काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केलं 


गडकरी पुढे म्हणाले की, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असो वा नसो, पण राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. आर्वी येथील निवडणूक सभेत गडकरींनी काँग्रेसवर ग्रामीण भागाचा विकास होत नसल्याचा आरोप केला. गडकरी म्हणाले की, काँग्रेसने ग्रामीण भारताच्या विकासाचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. ग्रामीण भारताला प्राधान्य दिले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि खेड्यात गरिबी नसती. भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.


मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती 


देश चालवायचा असेल तर चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार का तर यांना संविधान बदलायचे होते, असा घणाघाती प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आज शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.  


शरद पवार म्हणाले की, या राज्यात 900 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार केले गेले हे अतिशय दुर्दैवी आहे. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेसाठी दिलं, त्यांच्याच मुलाच्या मागे आपण ताकद उभं केली पाहिजे. बबनराव ढाकणे यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी उभ आयुष्य लोकांसाठी घातलं. त्यांची पुढची पिढी देखील विधिमंडळात आली पाहिजे. आज देशाची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हातात आहेत. त्यांची बोलण्याची भाषा एक आणि करण्याची एक आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी एक घोषणा केली चारशे पारची. देश चालवण्यास चारशे पारची गरज नाही. मात्र, चारशे पार कशासाठी तर यांना संविधान बदलायचे होते, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घटना बदलाची होती. 


इतर महत्वाच्या बातम्या