बीड : शिवसेनेसोबत युती ठेवायची असेल तर एमआयएमसारख्या (AIMIM) जातीवादी पक्षाला बाहेर काढा किंवा आम्हाला गटातून बाहेर जाण्याची परवानगी द्या, असे म्हणत परळीत शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. नगरपालिकेतील गटनेते पदावरून एमआयएमला सोबत घेतल्यानंतर शिंदे गटाने बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. परळी नगर परिषदेत महायुतीत एमआयएमला सोबत घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) नेतृत्वात येथील निवडणूक लढली गेली आहे.
बीडच्या परळी नगरपरिषदेत गटनेता निवडीवरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एमआयएम सारख्या जातीवादी पक्षाला सोबत घेतलं याची किंचितही आम्हाला जाणीव होऊ दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला शिवसेनेसोबत युती ठेवायची असेल तर एमआयएम सारख्या जातीवादी पक्षाला बाहेर काढा किंवा आम्हाला गटातून बाहेर जाण्याची परवानगी द्या, अशी भूमिका शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसमोर सह्या केल्या त्यावेळी कोणत्याही पक्षाचा उल्लेख केलेला नाही. एमआयएमला आम्ही जवळ केले नाही. हिंदुत्वाला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही. एक तर तुमच्यासोबत शिवसेना राहील किंवा एमआयएम आम्ही दोघेही या गटात राहू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. तसेच, अंबादास दानवे यांचे डोकं चंद्रकांत खैरे यांनी रिकामे केले अशी टीका देखील मुळूक यांनी यावेळी केली.
मुंडे बंधू-भगिनींच्या नेतृत्वात लढवली निवडणूक
दरम्यान, परळी नगरपालिका निवडणुकीत 35 जागांपैकी दोन जागा मतदानापूर्वीच महायुतीने बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित 33 जागांवर झालेल्या निवडणुकीतही महायुतीने स्पष्ट वर्चस्व राखले. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. धनंजय मुंडे येथील मतदारसंघातून आमदार आहेत, तर मंत्री पंकजा मुंडे याही सध्या मंत्री आहेत. त्यामुळे, महायुतीतील दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली येथील निवडणुका लढल्या गेल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीने एमआयएमला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
परळी नगरपालिकेतील सध्याचं संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 16
भाजप – 7
शिवसेना (शिंदे गट) – 2
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 2
काँग्रेस – 1
एमआयएम – 1
अपक्ष – 6