पुणे : पिंपरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) एकेरी भाषेत टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी त्यांना घेरलं. बापाची चप्पल पायात आली म्हणून लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये अशा शब्दात राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी महेश लांडगेंवर टीका केली. वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो हे लक्षात ठेवावं असा इशाराही सूरज चव्हाण यांनी दिला.
पिंपरी चिंडवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आहेत. प्रचाराच्या दरम्यान अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर टीका केली. दरम्यान, महेश लांडगे यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं. त्यानंतर सूरज चव्हाण यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं.
Suraj Chavan On Mahesh Landge : काय म्हणाले सूरज चव्हाण?
सोशल मीडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण म्हणाले की, "महेश लांडगे हा सुरुवातीला अजितदादांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवत असतो. अजितदादा ज्यावेळी डाव टाकतील त्यावेळी लांडगेचं चित होणं ठरलेलं आहे. लांडगे सारखा लुटारू पैलवान पुन्हा राजकीय मैदानात दिसणार नाही याचीही काळजी घेतील. बापाची चप्पल पायात आली म्हणजे लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये."
Mahesh Landge Vs Ajit Pawar : महेश लांडगेंची अजित पवारांवर टीका
पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्यातील संघर्ष चिघळल्याचं दिसून येतंय. अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना लांगडेंनी पुन्हा एकदा 70 हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका केली.
मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि संध्याकाळी अजित पवार भाजपात दाखल झाले असा टोला महेश लांडगेंनी लगावला. अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला होता. त्यानंतर संतापलेल्या लांडगेंनी 'तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का?' असा एकेरी उल्लेख केला. तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील, आमच्या नादी लागू नको, अशा एकेरी भाषेत महेश लांडगेंनी अजित पवारांवर टीका केली.
ही बातमी वाचा: