पुणे : महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. शक्य त्या ठिकाणी घडाळ्याच्या चिन्हावर तर शक्य त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर लढण्यात येणार आहे. असं असलं तरी पुण्यातील बारामती आणि दौंडमध्ये मात्र शरद पवारांच्या गटाला एकही जागा सोडण्यात आली नाही. या दोन्ही तालुक्यात अजित पवारांचे उमेदवार लढणार आहेत.

Continues below advertisement

बारामतीमधून जिल्हा परिषदेच्या तीन तर पंचायत समितीच्या सहा जागा शरद पवारांच्या पक्षाने मागितल्या होत्या. मात्र त्यापैकी जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षाला दिली नाही. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. 

कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा

स्थानिक नेत्यांशी बोलणी केली असता जागा दिली नसली तरीही अजितदादांसोबत राहू असं स्थानिक नेत्यांचे म्हणणं आहे. मात्र कार्यकर्ते नाराज झालेले आहेत असं स्थानिक नेते खासगीत सांगतात. तर दुसरीकडे दौंडमध्ये देखील राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची एकही जागा शरद पवारांच्या पक्षाला दिली नाही. 

Continues below advertisement

शरद पवारांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर काही कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. इंदापूर आणि पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने शरद पवारांच्या पक्षाला समाधानकारक जागा दिल्याने त्या ठिकाण मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत.

जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी घडाळ्यावर लढणार

जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथं ते चिन्ह वापरण्यात  येणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या एकाच चिन्हावर लढणार आहेत आणि या उमेदवारांची जबाबदारी तुतारीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. अमोल कोल्हेंवर असणार आहे. जुन्नर तालुक्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचं आव्हान असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

आंबेगावात तुतारी वि. घड्याळ लढत

शेजारच्या आंबेगाव तालुक्यात घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तुतारीकडून निवडणूक लढवणाऱ्या देवदत्त निकमांमध्ये समेट होऊ न शकल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणाचीही सरशी झाली तरी फायदा राष्ट्रवादीचाच होणार आहे. 

ही बातमी वाचा: