मुंबई : 'काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री झाले असते', असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात केलं. डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं.

एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात आज धनंजय मुंडे सहभागी झाले होते. "राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे विरोधीपक्षनेते आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर  विखे पाटील मुख्यमंत्री झाले असते. ही गोष्ट त्यांच्या चिरंजीवांच्या लक्षात आली नाही", असं मुंडे म्हणाले.

लोकसभा निवडणूकीच्या तयारीबाबत बोलताना मुंडे म्हणाले, "भाजप-शिवसेनेची युती झाली नव्हती तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सभा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे जवळपास सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत आम्ही प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजप सेनेची तर अजून यादी यायची बाकी आहे".

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माढा लोकसभा कोण लढवणार हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याबाबत बोलताना मुंडे म्हणाले की, "माढामध्ये मोहिते पाटील स्वतः खासदार आहेत. तिथं राष्ट्रवादी मजबूत पक्ष आहे. माढ्याबाबत पक्ष योग्य निर्णय करेल आणि ती जागा राष्ट्रवादीकडेच राहील".

धनूदादा अशी हाक आता कानावर पडत नाही
पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "राजकारणात येण्यापूर्वीचं माझं आणि बहिणीच नातं मला आवडतं. राजकारणात आल्यानंतर आमच्यात जे अंतर पडत गेलं ते व्हायला नको होतं. इतक्या वर्षात आता या नात्यात अंतर पडलं आहे. मला त्यांनी धनुदादा म्हणून हाक मारणं आता कानावर पडत नाही".

व्हिडीओ :


काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर विखे पाटील मुख्यमंत्री झाले असते : धनंजय मुंडे