आमची खात्री होती 10-12 जागा येतील, कालचे निकाल पाहिल्यावर धक्के बसले होते, ग्राउंड रियालिटी नसताना असे निकाल लागले, असे पाटील यांनी म्हटले आहे. आमच्या काही उमेदवारांना काही ठिकाणी अपेक्षित होतं तिथं मतं मिळाली नाहीत. म्हणजे जळगावच्या आमच्या उमेदवारांना त्यांच्या मामाच्या गावात त्यांना फक्त 8 मतं मिळाली. गाव मोठं असतानाही इतकी कमी मत मिळाली असे प्रश्न, शंका निर्माण झाल्या आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
आमच्या उमेदवारांना वाटतं हे जे मतदान मोजण्यात आलं ते खरं नाही. काही तरी घोटाळा आहे, हे उमेदवारांचं मत आहे. हे अजून ही माझं किंवा पक्षच मत नाही, असेही ते म्हणाले.
लोकं बोलतील कदाचित आम्ही पराभूत झालो म्हणून बोलतो. मी पक्षाचे मत सांगत नाही, पण आलेले अनुभव सांगत आहे. भविष्यात काही निष्कर्ष काढला तर तुम्हाला सांगू, असे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, या निवडणुकीत जवळपास 225 जागांवर युती पुढे आहे, म्हणजे युती आता विधानसभेत येणार असं युतीत वातावरण असेल. पण महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास आहे, त्यांना दिल्लीत कोणाला पाठवायचं आणि गावात, राज्यात कुणाला काम करायला द्यायचं, याचा फरक कळतो. हा फरक निवडणुकीत दिसेल, असे पाटील म्हणाले.
हातकणंगले मतदारसंघात शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा पराभव धक्कादायक आहे. राजू शेट्टी यांच्या सभांना मिळणाऱ्या गर्दीचा विरोधकांनी धसका घेतला होता. त्यामुळे आता शेतकरीच प्रश्न विचारत आहेत असं कसं झालं असंही पाटील यांनी सांगितलं.
सुरुवातीपासून वंचित आघाडीशी आम्ही चर्चा केली होती. परंतु चर्चा सुरु असतानाच ते उमेदवार जाहीर करत होते. त्यामुळे त्यांना आमच्याशी आघाडी करायची नव्हती शेवटी त्यांनी 48 उमेदवार उभे केले. त्यांना काही ठिकाणी चांगलं मतदान झाले आहे. त्यांचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला आहे अशी स्पष्ट कबुलीही पाटील यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर हे विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याचे तुम्ही सांगत आहात त्यांना शुभेच्छा परंतु आम्ही त्यांच्याशी चर्चा नक्की करु असेही पाटील म्हणाले.
आम्हाला राज्यात चांगलं वातावरण होते. राज ठाकरे यांच्यामुळे राज्यभर जागृती चांगली झालेली होती हे नक्की असेही पाटील म्हणाले.