सोलापूर : काही लोक माझ्यावर टीका करतात, माझ्या घरात ऐक्य नाही. माझ्या घरात काय चालतं हे मला कळत नाही मात्र दिल्लीत बसून मोदींना कळतंय. ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केली.
सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. वर्ध्यातील प्रचार सभेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली होती. "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. शरद पवारांची पक्षावरील पकड सैल होत असून पुतणे अजित पवार पक्षाचा ताबा घेत आहेत," असं मोदी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना पवार यांनी मोदींवर कडाडून टीका केली.
शरद पवार यावेळी म्हणाले की, सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे मोदींनी दाखवलं. मोदींनी नोटबंदी केली, संपूर्ण देश लाईनमध्ये उभा राहिला, 100 लोकं गेली, 15 लाख नोकऱ्या फक्त नोटबंदीमुळे गेल्या. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं काळा पैसा संपवतो, 2 करोड नोकऱ्या देतो, मात्र एक नोकरी दिली नाही, उलट असलेल्या नोकऱ्या या निर्णयामुळे गेल्या, असेही पवार म्हणाले. शेवटी, रिझर्व्ह बँकेने सांगितले नोटबंदीचा निर्णय चुकला. आम्ही सांगितलं होतं ऐकलं नाही, हा माणूस कोणाचंच ऐकत नाही, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, मी सोलापूरचा खासदार कोण? शोधण्याचा प्रयत्न केला. ते दिल्लीतही सापडले नाहीत. कर्तृत्ववान प्रतिनिधीला तुम्ही संधी दिली नाही. चुका होतात मात्र आता चूक सुधारून सुशीलकुमार शिंदेंना पुन्हा निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
कुठलाही साधू हात पसरवू शकत नाही, मत मागणारा साधू कसा. स्वतःला देव म्हणणारे भगव्याचं भांडवल करत आहेत, अशी टीका त्यांनी भाजप उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर केली. महाराज दक्षिणा घ्या, मठात बसा, राजकारण करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोला अशी चिठ्ठी आली असता ज्यांचं सोलापुरात काही योगदान नाही त्यांच्यावर शब्द का खर्च करू, असे म्हणत शरद पवारांनी त्यांच्यावर बोलणे टाळले.
ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलतायत, शरद पवारांची मोदींवर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2019 10:43 PM (IST)
स्वतःला देव म्हणणारे भगव्याचं भांडवल करत आहेत, अशी टीका त्यांनी भाजप उमेदवार डॉ. जय सिद्धेवर स्वामी यांच्यावर केली. महाराज दक्षिणा घ्या, मठात बसा, राजकारण करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -