मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काल (21 ऑक्टोबर) मतदान पार पडलं. सर्वच उमेदवार आता 24 ऑक्टोबरची म्हणजे निकालाची वाट पाहत असून उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. एकीकडे सर्वच उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असताना काही ठिकाणी उमेदवारांनी मिरवणूक, बॅनर्स लावून विजय साजरा केला आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांचा सामना शिवसेनेच्या संजय घाटगे यांच्याशी आहे. मात्र मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घाटगे यांना इतकं हलक्यात घेतलंय की, त्यांनी मतदान पार पडल्यानंतर लगेचच मुश्रीफांची विजयी मिरवणूक काढली. मुश्रीफ यांनी गुलाल उधळत आनंद साजरा करत खास उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने कॉलरही उडवली.
रत्नागिरीतील दापोलीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनीही निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढली. विशेष बाब म्हणजे संजय कदमांनी आतापर्यंत लढलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये निकालापूर्वीच विजय साजरा केला आहे. संजय कदम यांच्याविरुद्ध शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांचं तगडं आव्हान आहे.
पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचे संध्याकाळपासून वारजे भागात आमदार झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. एवढंच नाही तर दोडकेंच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली आणि फटाक्यांची आतषबाजी देखील केली. मात्र या सर्व उमेदवारांचा हा कान्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स हे येत्या 24 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.