Sangli Municipal Corporation Election: सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझीवर हद्दपारीची कारवाई केली होती. आझम काझीसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणातील टोळीतील आठ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली. आज (9 जानेवारी) अजित पवारांची सभा असतानाच काल कारवाई झाल्याने राजकीय भूवया उंचावल्या होत्या. दरम्यान, आज अजित पवारांच्या सभेदरम्यान आझम काझीने शक्तीप्रदर्शन करत हजेरी लावली.
अजित पवारांनी भेट टाळली
हद्दपार कारवाईच्या पार्श्वभूमीवर काझी यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सभास्थळी काझी यांचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. थेट हद्दपारीची कारवाई झाल्याने आझम काझी अजित पवार यांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत होता. त्यामुळे अजित पवार आझम काझीला भेट देणार का? याकडे लक्ष होते. मात्र, आझम काझीला अजित पवार यांनी भेटणे टाळलं. काझी उभा असलेल्या ठिकाणावरून न जाता दुसऱ्या मार्गाने अजित पवार व्यासपीठावर उतरून रवाना झाले. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर गेल्या काही दिवसापासून जोरदार टीका होत होती.
शेरीनाल्याचा तुकडाच पाडून टाकतो
दरम्यान, अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, किती निवडणूक झाल्या. मात्र, सांगलीतील शेरीनाल्याचा मुद्दा तसाच राहिला आहे. आम्हाला एकदा संधी द्या, सांगलीमधील शेरीनाल्याचा प्रश्नाचा मी तुकडाच पाडून टाकतो, असे आश्वासन त्यांनी दिले. सांगलीला विमानतळ नाही, चांगला मोबदला देऊन विमानतळासाठी जमीन घेऊ शकतो. कोल्हापूरला विमानतळ आहे म्हणून सांगलीला नको असं म्हणायला नको. आम्हाला सांगलीचा विकास करायचा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत आम्ही 33 उमेदवार उभे केले आहेत. प्रभाग चारमध्ये आम्ही एक उमेदवार पुरस्कृत केला आहे. वॉनलेस हॉस्पिटल काही दिवसापासून बंद आहे, हॉस्पिटल चालू करण्यासाठी प्रयत्न करू. जो शब्द आम्ही देतो तो शब्द आम्ही पाळतो, असे ते म्हणाले.
मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणांची बरसात
- मिरज, सांगलीत सुसज्ज भाजीमंडई तसेच महापालिकेसाठी स्वतंत्र इमारत यासह अनेक घोषणांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या .
- सांगलीकरांना दररोज स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी शेरीनाला प्रश्नाचा एकदाच तुकडा पाडणार
- भयमुक्त व नशा मुक्त शहरासाठी प्रयत्न करणार
- सांगली मार्केट यार्ड व मिरज बाजारपेठेत तसेच एमआयडीसीमध्ये रस्ते व ड्रेनेजची चांगली सुविधा करणार
- सांगली सिव्हिल हॉस्पिटल साठी 15 कोटींची मदत जाहीर
- मिरज दर्गा विकासासाठी निधी देणार
- वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी, रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी, हायटेक आरोग्य सुविधेसाठी व प्रदूषण मुक्त शहरासाठी कटिबद्ध
- कवलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार
- शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत असल्यामुळे तिन्ही शहरात जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार
इतर महत्वाच्या बातम्या