Navi Mumbai Mahanagar Palika election : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या काळात राजकीय नेत ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप देखील करताना दिसत आहेत. अशातच नवी मुंबईत देखील देखील राजकीय वातावरण तापलं आहे. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटली असून, या दोन्ही पक्षातच मुख्य लढत होत आहे. दरम्यान, या निवडणुकीत महापालिकेची नवी प्रभाग रचना ही केवळ कागदावरील फेरबदल नसून, ती प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या मक्तेदारीला जबर धक्का देणारी ठरण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेत 111 नगरसेवकांसाठी 28 प्रभागांची नव्याने आखणी करताना अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे ‘सेफ’ मानले जाणारे प्रभाग अक्षरशः फोडण्यात आले आहेत. परिणामी, एकाच प्रभागात ठाण मांडून बसलेली प्रस्थापित सत्ता आज अस्वस्थ आणि बचावात्मक झाल्याचे दिसत आहे.
कल्याण तालुक्यातील 14 गावांचा महापालिकेत समावेश होऊनही नगरसेवकांची संख्या वाढली नाही
मागील निवडणुकीत स्वतंत्र प्रभाग रचनेचा फायदा घेत सत्ता मिळवणाऱ्या प्रस्थापितांची आजची स्थिती वेगळी आहे. नव्या रचनेमुळे जुनी मतपेढी तुटली आहे, परिचित मतदारसंघ बदलले आहेत आणि राजकीय गणिते कोलमडली आहेत. याचा थेट फटका प्रस्थापितांना बसत असून, त्यांचे आत्मविश्वासाचे कवच गळून पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, कल्याण तालुक्यातील 14 गावांचा महापालिकेत समावेश होऊनही नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. यामुळे नव्याने समाविष्ट भागांतील मतदारांमध्ये नाराजी आहे. या भागांकडे मागील सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले, ही बाब आता मतदार उघडपणे बोलू लागले आहेत. जुन्या सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा हाच मोठा हिशोब आता निवडणुकीत चुकता होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे नगरसेवक वाढण्याची शक्यता
याच पार्श्वभूमीवर, मागील निवडणुकीत शिवसेनेचे 38 नगरसेवक निवडून आले होते हे वास्तव दुर्लक्ष करण्याजोगे नाही. त्या आकड्यात आता निश्चितच वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बदललेली प्रभाग रचना, प्रस्थापितांची धास्ती आणि जनतेचा वाढता कल लक्षात घेता, सत्ताकाबीज करण्याच्या दिशेने शिवसेनेची पावले ठामपणे पडत असल्याचे बोलले जात आहे.या सगळ्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरताना दिसत आहे. प्रशासन चालवण्याचा अनुभव, निर्णयक्षमता आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व अशी प्रतिमा एकनाथ शिंदे यांनी तयार केली आहे. त्यामुळे “कोण काम करू शकतो?” या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या मतदारांचा कल त्यांच्या नेतृत्वाकडे झुकताना दिसतो आहे.
नव्या प्रभाग रचनेमुळे आता केवळ नाव, जुनी ओळख किंवा जातीय समीकरणांवर निवडणूक जिंकणे शक्य राहिलेले नाही. प्रत्यक्ष काम, लोकांशी थेट संपर्क आणि विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड हाच निर्णायक ठरणार आहे. आणि याच मुद्द्यावर प्रस्थापित कमकुवत, तर शिवसेना अधिक मजबूत भासते आहे. थोडक्यात सांगायचे तर प्रभाग रचना बदलली आहे, पण खरी धास्ती प्रस्थापितांना बसली आहे. जुनी सत्ता टिकवण्यासाठी गोंधळलेल्या नेत्यांच्या तुलनेत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा वर्ग नवी मुंबईत वाढताना दिसतो आहे. त्यामुळे या नव्या प्रभाग रचनेचा थेट आणि मोठा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही निवडणूक केवळ आकड्यांची नाही, तर नेतृत्व विरुद्ध प्रस्थापित अहंकार अशी लढत ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या: