Nashik Mayor: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार यंदा राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार असून 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळाली आहे. या आरक्षण सोडतीत नाशिक महापालिकेचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. बहुमतासह सत्ता मिळवलेल्या भाजपमध्ये महापौर कोण होणार, याबाबत चर्चा रंगली असून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी यासंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

Continues below advertisement

नाशिकमध्ये नवा चेहरा महापौर होणार, असे संकेत भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिले आहेत.  नाशिक महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून महापौरपदाबाबत लवकरच निर्णय होणार आहे. येत्या दोन दिवसांत महापौरपदाचं नाव जाहीर करू. भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देतो, असे सुनील केदार यांनी म्हटले. भाजपकडून तब्बल 16 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. महापौरपदाचा निर्णय भाजप कोअर कमिटी घेणार आहे. भाजप नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देतो, नाशिकमध्येही तेच होणार, असे देखील त्यांनी सांगितले आहे. सुनील केदार यांच्या या वक्तव्यामुळे अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे.

Himgauri Adke : हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर 

नाशिकमध्ये महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांचे नाव सध्या सर्वाधिक प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. हिमगौरी आडके यांनी याआधी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांचे बंधू राहुल आहेर हे सध्या चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, आहेर कुटुंब हे सुरुवातीपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आहे. विशेष म्हणजे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा महापौरपदी देण्याकडे भाजपचा कल असल्याचे बोलले जात आहे. त्या निकषांवर हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर आहे.

Continues below advertisement

Nashik Mayor: भाजप ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करणार?

हिमगौरी आडके यांच्यासोबत काही इतर महिला नगरसेविकांची नावे देखील चर्चेत आहेत. तर स्वाती भामरे, डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी यांच्या देखील नावाची चर्चा रंगली आहे.  मात्र, स्थानिक आमदारांचे लॉबिंग, वरिष्ठ नेत्यांची भूमिका आणि कोअर कमिटीतील गणित यावर अंतिम निर्णय अवलंबून असणार आहे. भाजप ऐनवेळी “धक्का तंत्र” वापरून एखाद्या नवख्या चेहऱ्याला संधी देणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nashik Mayor: कुंभमेळा आणि नाशिकचा ब्रॅण्डिंग फॅक्टर

आगामी काळात नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून, हा काळ नाशिक शहरासाठी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचे देशभरच नव्हे, तर जागतिक पातळीवर ब्रॅण्डिंग करण्याची संधी भाजपला मिळणार आहे. त्यामुळेच प्रशासकीय समज, राजकीय तोल आणि स्वच्छ प्रतिमा असलेला महापौर देणं भाजपसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.

Nashik Mayor:  नाशिक महापालिका : खुला महिला प्रवर्गातील संभाव्य नावे

चंद्रकला धुमाळ

रोहिणी पिंगळे

हिमगौरी आडके

स्वाती भामरे

माधुरी बोलकर

संध्या अभिजीत कुलकर्णी

प्रतिभा बाळासाहेब पवार

डॉ. योगिता अपूर्व हिरे

डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी

आणखी वाचा 

North Maharashtra Mayor Reservation: महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, नाशिक, धुळे, मालेगाव, अहिल्यानगर, जळगावमध्ये 'या' प्रवर्गाला संधी, प्रमुख दावेदार कोण? जाणून घ्या एकाच क्लिकवर...