Nashik Mayor: नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण (Nashik Municipal Corporation Mayor Reservation) जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली असून, प्रमुख पदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Nashik Mayor: बडे नेते गिरीश महाजनांच्या भेटीला

महापौर आरक्षण सोडतीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेत आयुक्तांची भेट घेतली आहे. महापौरपदाच्या प्रबळ दावेदार हिमगौरी आडके यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. तर गणेश गीते, सुधाकर बडगुजर, सुरेश पाटील हे देखील महत्त्वाच्या पदांसाठी महाजनांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी सुधाकर बडगुजर यांच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयालाही भेट दिली असून नाशिक महापालिकेतील प्रमुख पदांसाठी नगरसेवकांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे.

Nashik Mayor: आरक्षण जाहीर, नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार यंदा राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला महापौर असणार असून 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळाली आहे. या सोडतीत नाशिक महापालिकेचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने बहुमतासह सत्ता मिळवलेल्या भाजपमध्ये महापौरपदासाठी स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.

Nashik Mayor: “नवा चेहरा महापौर होणार”, सुनील केदारांचे संकेत

भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महापौरपदाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, नाशिक महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. भाजपकडून 16 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. महापौरपदाचा निर्णय भाजप कोअर कमिटी घेणार आहे. येत्या दोन दिवसांत महापौरपदाचे नाव जाहीर केले जाईल. भाजप नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देतो, नाशिकमध्येही तेच होणार, असे सुनील केदार यांनी म्हटले आहे.

Himgauri Adke : हिमगौरी आडके यांचे नाव चर्चेत 

नाशिकमध्ये महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांचे नाव सध्या सर्वाधिक प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. त्यांनी याआधी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांचे बंधू राहुल आहेर हे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, आहेर कुटुंब हे भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा महापौरपदी देण्याकडे भाजपचा कल असल्याने हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.

Nashik Mayor : इतर दावेदारांचीही जोरदार चर्चा

हिमगौरी आडके यांच्यासह इतर काही महिला नगरसेविकांची नावे देखील चर्चेत आहेत.

चंद्रकला धुमाळ

रोहिणी पिंगळे

स्वाती भामरे

माधुरी बोलकर

संध्या अभिजीत कुलकर्णी

प्रतिभा बाळासाहेब पवार

डॉ. योगिता अपूर्व हिरे

डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी

आणखी वाचा 

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, नाशिक, धुळे, मालेगाव, अहिल्यानगर, जळगावमध्ये 'या' प्रवर्गाला संधी, प्रमुख दावेदार कोण? जाणून घ्या एकाच क्लिकवर...