Nashik Mayor Reservation: नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Nashik Municipal Corporation Election 2026) भाजपने (BJP) सर्वाधिक 72 जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर, आता पक्षातील इच्छुकांचे लक्ष थेट महापौरपदाच्या आरक्षण (Mayor Reservation) सोडतीकडे लागले आहे. महापौरपदासाठी कोणत्या प्रवर्गाला संधी मिळणार, यावरच पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याने या सोडतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Continues below advertisement

मागील पंचवार्षिक कालावधीत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित होते, तर त्यानंतरच्या अडीच वर्षांत सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. त्यामुळे आता रोटेशन पद्धतीने आरक्षण ठरल्यास, यावेळी महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, चिठ्ठी पद्धतीने सोडत काढल्यास आरक्षण कोणत्याही अन्य प्रवर्गासाठी निघू शकते. त्यामुळे भाजपमधील इच्छुक उमेदवार आरक्षण सोडतीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Nashik Mayor Reservation : महापौर आरक्षणाची सोडत बुधवारी निघणार?

सामान्यतः महापालिका निवडणुकीपूर्वी आरक्षण सोडत जाहीर केली जाते. मात्र, यंदा निवडणूक पार पडल्यानंतर ही सोडत बुधवारी, दि. 21 रोजी निघण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडतीची तयारी सध्या सुरू आहे.

Continues below advertisement

Nashik Mayor : महापौरपदासाठी 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा  

यंदा भाजपकडून महापौरपदासाठी हिमगौरी आडके, दीपाली गणेश गिते, दिनकर पाटील, सुधाकर बडगुजर, सुरेश पाटील आणि योगिता हिरे यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय आरक्षणाच्या निर्णयानुसार इतर अनेक नगरसेवकही दावेदारी करू शकतात. यामध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेले राजेंद्र गांगुर्डे, श्याम बडोदे, प्रशांत दिवे, भगवान दोंदे यांच्यासह महिलांमध्ये रूपाली नन्नावरे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे यांच्या पत्नी इंदुमती खेताडे आणि रूपाली निकुळे यांचाही समावेश आहे.

Nashik Election Result 2026: नवनिर्वाचित नगरसेवकांची राजपत्रात नोंद प्रक्रिया

महानगरपालिकेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून निवडून आलेल्या 122 नगरसेवकांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत उमेदवाराचे नाव, प्रभाग क्रमांक, आरक्षण प्रवर्ग आणि पक्ष अथवा अपक्ष अशी सविस्तर माहिती नमूद आहे. ही प्रमाणित यादी एक ते दोन दिवसांत महापालिकेमार्फत शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या स्वाक्षरीने आवश्यक कागदपत्रांसह हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. त्यानंतर नगरविकास विभागाकडून छाननी पूर्ण झाल्यावर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची नावे शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.

आणखी वाचा 

BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार