Nashik Mayor Election 2026: नाशिकमध्ये ऐनवेळी शिवसेनेला उपमहापौरपद का दिले? गिरीश महाजनांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Nashik Mayor Election 2026: नाशिक महापालिकेत भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.

Nashik Mayor Election 2026: नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena) सत्ता स्थापन केली आहे. निवडणुकीत परस्परांविरोधात लढलेले हे दोन पक्ष आता सत्तेत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या हिमगौरी आडके (Himgauri Adke) यांची महापौरपदी तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे (Vilas Shinde) यांची उपमहापौरपदी निवड झाली. नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने उपमहापौरपदासाठी भाजपचे मच्छिंद्र सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मच्छिंद्र सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. नाशिकमध्ये ऐनवेळी शिवसेनेला उपमहापौरपद का दिले? याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, आम्ही शिवसेनेचा उपमहापौर केलेला आहे. मी मतदारांचे आभार मानतो. आम्हाला स्पष्ट बहुमत दिलेले आहे. आम्ही दोघे आता एकत्र झालोत, आता शंभर पल्स झालेलं आहे. आता नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. नाशिकमध्ये मोठा निधी आलेला आहे. कुंभमेळा होईपर्यंत माझा मुक्काम इथेच राहणार आहे. नाशिक हे एक मोठे शहर आहे. नाशिककडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आम्हाला सर्वच क्षेत्रात काम करायचे आहे. महापौर, उपमहापौर आमचे आहे. विकास हाच आमचा केंद्रबिंदू राहणार आहे. राज्यभरात आम्ही वेगवेगळे लढलो. अनेक ठिकाणी वेगळे लढलो. मात्र, आता एकत्र झालेलो आहोत. केंद्रात एक आहोत, राज्यात एक आहोत मग महापालिकेमध्ये का एक होऊ नये, असे त्यांनी म्हटले.
Nashik Mayor Election 2026: वरून निरोप आला अन् विलास शिंदेंना उपमहापौर केलं
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, महापौरांचा कार्यकाळ ठरलेला नाही. पण, वरिष्ठ त्यात निर्णय घेतील. पहाटे उपमहापौरांचे नाव ठरले. मच्छिंद्र सानप यांचे नाव आम्ही उपमहापौरपदासाठी जाहीर केले होते. मात्र, वरून निरोप आला. मग शिवसेनेचे विलास शिंदे यांना उपमहापौर केले. दोन-तीन दिवसांपासून आमची तयारी झालेली होती. खूप आव्हान होते. भाजप म्हणून आम्ही 72 जागा जिंकलेल्या आहेत. जिथे आव्हान आहे, तिथेच काम होतं. आमच्याकडे सगळ्यांना मोकळीक आहे. आम्ही अनुभवी लोक दिलेले आहेत. कुंभमेळ्याचे मोठे आव्हान आमच्या समोर आहे. नाशिक शहराचा चेहरा मोहरा आम्हाला बदलायचा आहे. आम्ही एक म्हणून लढलो असतो तर शंभरी पार केली असती, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Nashik MNS: नाशिकमध्ये मनसेची मोठी खेळी, एकमेव नगरसेविकेचा शिंदे गटाला पाठिंबा; ठाकरेंची साथ सोडली!




















