Nashik Mayor Election 2026: नाशिक महानगरपालिकेत (NMC) अखेर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाची (Shiv Sena) सत्ता स्थापना निश्चित झाली आहे. निवडणुकीत परस्परांविरोधात लढलेले हे दोन पक्ष आता सत्तेत एकत्र आले असून, भाजपच्या हिमगौरी आडके (Himgauri Adke) यांची महापौरपदी तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे (Vilas Shinde) यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया पार पडली.

महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना, “आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही,” अशी भूमिका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर भाजप–शिवसेना शिंदे गट युतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भाजपकडे महापौरपद, तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उपमहापौरपदासाठी सुरुवातीला शिवसेनेच्या बंटी तिदमे यांनीदेखील अर्ज दाखल केला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवरील निर्णयानंतर विलास शिंदे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात भाजपकडून नगरसेवकांना अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता. त्यानुसार महापौरपदासाठी हिमगौरी आडके, तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Nashik Mayor Election 2026: ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा

दरम्यान, या सत्ता स्थापनेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला पाठिंबा दिला आहे. तसेच मनसेही सत्तेत सहभागी होत असल्याने नाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे अशी महायुती सत्तेत आली आहे. या घडामोडीमुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nashik Mayor Election 2026: महापौर-उपमहापौरपदाची बिनविरोध निवड

महापौर पदासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार सीमा पवार यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली. माघार अर्ज देण्यासाठी त्या हिमगौरी आडके यांच्यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी, “कुठल्याही दबावाखाली माघार घेत आहात का?” असा प्रश्न विचारला असता, सीमा पवार यांनी तसे नसल्याचे स्पष्ट करत स्वेच्छेने माघार घेतल्याचे सांगितले. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी हिमगौरी आडके यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच उपमहापौरपदासाठीही अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने विलास शिंदे यांची निवडही बिनविरोध झाली.

आणखी वाचा 

Malegaon Mayor Election 2026: ...तर मालेगावात शिवसेनेचा महापौर बसणार; दादा भुसे, मौलाना मुफ्तींच्या भेटीने राजकारण ढवळलं, नेमकं काय घडलं?