Narendra Modi, Nanded : "नांदेडवरुन जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे पूर्ण मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळेल. नांदेड ते दिल्ली आणि आदमपूरसाठी विमानसेवा सुरु झाली आहे. लवकरच आपल्या शीख बांधवांना नांदेडमधून अमृतसरपर्यंतचा विमान प्रवास करण्याची संधी देखील मिळणार आहे", असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केलाय. ते नांदेड (Nanded) येथील सभेत बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, मी मराठवाड्याच्या भूमीवरुन स्वामी रामानंद तीर्थ आणि येथील स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धापूर्वक नमस्कार करतो. आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या समर्थनार्थ एक लाट सुरु आहे. प्रत्येकाच्या तोंडी आज एकही नारा आहे की, भाजप-महायुती आहे, तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. आज देश विकसित भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे जात आहे. देशातील लोकांना माहिती आहे की, विकसित देश बनण्यासाठी भाजप आणि मित्रपक्ष गांभिर्याने काम करत आहेत. त्यामुळे एनडीए आणि भाजप सरकारला लोक सातत्याने निवडून देत आहेत. केंद्रात देशाने लागोपाठ दिसऱ्यांदा एनडीएला सेवा करण्याची संधी दिली आहे. मात्र, यावेळी त्यामध्ये नांदेडचे फुल नव्हते. यावेळी नांदेडचं फुल दिल्लीला पोहोचेल का? असा सवालही पीएम मोदींनी केला.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आज मी डबल ड्युटी करत आहे. एकतर मी मोदीसाठीही मदत मागत आहे आणि याशिवाय मी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील आशीर्वाद मागत आहे. नांदेड लोकसभा क्षेत्रातील लोकांना दोन वेळेस मतदान करायचे आहे. हरियाणाच्या निवडणुकीत भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. आता हाच इतिहास महाराष्ट्रातील जनता देखील रचणार आहे. मागील दोन दिवसांपासून मी जेथे जेथे गेलो, तेथे लोकांमध्ये मला जाणवलं की, लोकसभेला राहिलेली कसर विधानसभेला भरुन काढली जाईल. तुम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये वाटले जाल, तर तुमची संख्या कमी होईल. मग काँग्रेसवाले तुमचं आरक्षण तुमच्यापासून हिरावून घेतील.
लोक म्हणतात विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीचे सरकार पाहिजे. महायुतीचीच सरकार पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या पापाला अनेक वर्ष सहन करावे लागले आहे. काँग्रेस सरकारने येथील शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाची पर्वा केली नाही. दुष्काळापासून तुम्हाला दूर करण्यासाठी अनेक पाऊलं उचलले आहेत, असंही मोदी यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या