मुंबई : देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात 8 सभा घेतल्या. त्यापैकी, आज शेवटची सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर घेत राज्यातील निवडणूक प्रचाराचा समारोप केला. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी सिद्धिविनायक गणेश, मुंबादेवी आणि महालक्ष्मीच्याचरणी मी प्रणाम करतो, असे म्हणत मुंबईकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. तसेच, आज क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांची जयंती आहे, त्यांना देखील नमन करतो, असे मोदींनी म्हटले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारातील आजची माझी शेवटची सभा आहे, मी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे, आज मी आमच्या मुंबईत (Mumbai) आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. आज एकच आवाज आहे, भाजप महायुती आहे तर गती आहे, तरच महाराष्ट्राची प्रगती आहे, असे म्हणत मोदींनी महायुती सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरुन बोलताना त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव घेत काँग्रेस व उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
नरेंद्र मोदींनी राज्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सभा घेतली, या ठिकाणी भाषण करताना कलम 370, शेतकऱ्यांचे उत्पन्न, जातीवाद, दहशतवाद या मुद्द्यांवर भाष्य करताना काँग्रेसला लक्ष्य केले. विशेष म्हणजे आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर व्यक्तिगत टीका टाळल्याचं दिसून आलं. मात्र, मुंबईतील शिवाजी पार्कवर भाषण करताना मोदींनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. मुंबईचा स्वभाव इमानदारी आणि मेहनत आहे. मात्र, काँग्रेसचा स्वभाव हा भ्रष्टाचार, अडथळे आणणे असा आहे. त्यामुळेच ते अटल सेतू व मेट्रोचा विरोध हे करत होते, डिजिटल इंडिया आणि युपीआयचं बोलत होतो तेव्हा मजाक उडवत होते. ही लोकं मुंबईला पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत, आम्ही जोडायला पुढे येतो. मात्र, मविआ तोडायची भाषा करते, मुंबईत अनेक भाषांची लोकं येतात, मात्र मविआ भांडणं लावते. काँग्रेस सरकार बनवण्यासाठी तडफडत आहे, एससी, एसटी, ओबीसी यांच्यात भांडणं लावत आहेत. आरक्षण देखील ही लोकं तुमचं घेऊन टाकतील, त्यामुळे एक है तो सेफ है.. असा नारा मोदींनी मुंबईतून दिला.
बाळासाहेब ठाकरेंच नाव घेऊन उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई हे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचे, स्वाभिमानाचे शहर आहे. मात्र, एक पक्ष मविआत आहे, ज्याने कांग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे, असे म्हणत मोदींनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेसच्या शहजादाकडून बाळासाहेबांचे गौरवउद्गार काढायला सांगा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला लावा, असं चॅलेंजही मोदींनी उद्धव ठाकरेंना दिलं.
महाविकास आघाडीवरही टीका
सावरकरांना शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे टाकत फिरत आहेत, महाराष्ट्रातून नवी चिंतनची नवी धारा निघाली आहे, संतांनी दिशा दाखवली, छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प घेतला. देशभक्ती टिळकांनी दाखवली, दुसरीकडे एक विचार मविआचा देखील आहे, जो राज्याच्या विचाराला अपमानित करत आहे. हे सगळे तुष्टीकरणाला बळी पडले आहेत, मतांसाठी भगवा दहशतवाद बोलतात, सावरकरांचा अपमान करतात, काश्मीरमध्ये 370 साठीचा नवा प्रस्ताव समोर ठेवतात, असे म्हणत मोदींनी महाविकास आघाडीवर व काँग्रेसवर टीका केली.
नरेंद्र मोदींच्या मुंबईतील 8 मतदारसंघात झाल्या सभा
धुळे
नाशिक
चिमूर
सोलापूर
पुणे
छत्रपती संभाजीनगर
पनवेल
मुंबई
हेही वाचा
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?