राजकीय कारकीर्द हिंसेची असलेल्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश नको
नारायण राणे 2 ऑक्टोबरला म्हणजेच महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. "परंतु महात्मा गांधी अहिंसेचे पुजारी होते, त्याच दिवशी ज्यांची राजकीय कारकीर्द हिंसेची राहिली अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देऊ नये," अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचंही दीपक केसरकर म्हणाले. तसंच शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचा ठाम विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सतीश सावंत खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त
नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी सतीश सावंत यांनी काल (30 सप्टेंबर) महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. याविषयी दीपक केसरकर म्हणाले की, "सतीश सावंत खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त झाले. सतीश सावंत यानी स्वाभिमानाने घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. राणेंना कार्यकर्ते सोडून जाण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. राणे म्हणतात भाजपमध्ये जाणार, मात्र भाजपमध्ये जाण्यापूर्वी राणेंनी मागे वळून पाहिलं तर पाठीमागे कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत, अशी आजची त्यांची परिस्थिती आहे."
राणेंचा भाजपप्रवेश घडणार नाही
ज्या बाळासाहेबांनी राणेना घडवलं, त्यांच्याबद्दल त्यांनी जे केलेलं कृत्य आहे, त्याचा नियतीने घेतलेला हा सूड आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बाळासाहेबांना जर कुणी दुखावलं असेल तर ते नारायण राणेंनी. महाराष्ट्राची जनता, शिवसेना तसंच सर्वसामान्य कार्यकर्तेही कधी विसरणार नाहीत. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. राणेंनी कितीही तारखा मागू द्या, किंवा त्यांना तारखा मिळू द्या, राणेंचा भाजप प्रवेश घडणार नाही.
राणेंना प्रवेश देऊन सिंधुदुर्गला दु:खात लोटू नका
माझी राजकीय कारकीर्द पणाला लावून गेल्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा शांत ठेवला. मात्र राणेंना भाजपप्रवेश देऊन जिल्ह्यातील जनतेला पुन्हा त्याच दुःखात लोटून देणं हे कधीही हिताचं ठरणार नाही. अशा प्रवृतीला पुन्हा जिवंत करु नका, त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, अशी विरोधाची भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली आहे.