नांदेड : महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातून भाजपत गेलेल्या 31 जणांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे विजयाची खात्री असलेल्यांना उमेदवारी हे खासदार अशोक चव्हाण यांचे नियोजन यशस्वी झाले आहे. परंतु शहर विकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसमधील मंडळींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग मात्र सपशेल अपयशी ठरला आहे.
काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपत गेले होते
खासदार अशोकराव चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपत गेले होते, परंतु शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना मात्र वेट ॲन्ड वॉचचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत काही प्रवेश करून घेण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगच लागल्याचे चित्र दिसून आले. खासदार चव्हाण यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजपत प्रवेश देऊन महापालिकेची उमेदवारीही दिली. त्यात मोजके अपवाद वगळता, बहुतांश जणांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
विजयी झालेले उमेदवार
विजय मिळवलेल्या उमेदवारांमध्ये शिला भवरे, राजेश यन्नम, वैशाली देशमुख, सविता गड्डम, उमेश चव्हाण, प्रियंका संघरत्न कांबळे, वीरेंद्र गाडीवाले, दीपाली मोरे, अनुराधा काळे, सुलोचना काकडे, निरंजना लांडगे, वैजनाथ देशमुख, सुवर्णा बस्वदे, संजय घोगरे, तुलजाराम यादव, प्रभाबाई यादव, मनजीकौर कुंजीवाले, सुमीत मुथा, गुरमितसिंघ नवाब, सरिता बिरकले, शैलजा स्वामी, प्रशांत तिडके, जयश्री पावडे, किशोर स्वामी, बलवंतसिंघ गाडीवाले, सरस्वती राऊत, कविता मुळे, सतीश देशमुख आणि सरिता पवळे यांचा समावेश आहे.
पराभव झालेले उमेदवार
संदीप सोनकांबळे, नागेश कोकुलवार, दीपक पाटील, दिनेश मोरताळे आणि सखाराम तुप्पेकर या मंडळींना मात्र निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नशीब आजमावत असलेल्यांच्या पदरीही पराभव आला.
स्वीकृत सदस्यांचे गाजर दाखविलेल्या मंडळींची संख्या मोठी
महापालिका निवडणुकीत भाजपत जुने आणि नवे असा वाद निर्माण झाला होता. निष्ठावंत मंडळींना तिकीट नाकारल्याने त्यांनी ऐन वेळी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी दाखल केली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली, तर बहुतांश नाराजांना स्वीकृत सदस्य पदाचे आश्वासन देऊन शांत करण्यात आले होते. प्रत्येक प्रभागात अशा स्वीकृत सदस्यांचे गाजर दाखविलेल्या मंडळींची संख्या मोठी आहे. त्यातील कुणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.