Nanded Election Result 2026: नांदेड महापालिका निवडणुकीनंतरही (Nanded Election Result 2026) राजकीय तापमान शांत होण्याऐवजी अधिकच वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजपचे पराभूत उमेदवार दीपक पाटील (Deepak Patil) यांच्या घरासमोर मध्यरात्री फटाके वाजवून धमकावण्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
ही घटना 18 जानेवारीच्या मध्यरात्री घडली. तरोडा परिसरातून निवडणूक लढवलेले भाजप उमेदवार दीपक पाटील यांचा पराभव झाल्यानंतर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, वैभव मठपती, संदीप जनकवाडे आणि शेकापुरे हे चार जण पाटील यांच्या घरासमोर आले. त्यांनी जोरजोरात फटाके वाजवले, शिवीगाळ केली.
Nanded Election Result 2026: पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
“तुझा संतोष देशमुखसारखा गेम वाजवतो,” अशी थेट धमकी दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी दीपक पाटील यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान, घरासमोर फटाके वाजवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक संपल्यानंतरही अशा प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये राजकीय विजयाचा उन्माद किती टोकाला जाऊ शकतो, याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. निवडणूक निकालानंतरही राजकीय संघर्ष चिघळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नांदेडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.
Nanded Mayor Election: महापौर पद आरक्षणाचा फैसला 22 जानेवारीला
दरम्यान, नांदेड महापालिकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचा एक अपवाद वगळता तब्बल 13 वेळा महापौरपद काँग्रेसकडेच राहिले. मात्र, यावेळच्या निवडणुकीत राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असून भाजपने महापालिकेवर सत्ता मिळवत आपला झेंडा फडकावला आहे. त्यामुळे आता महापौरपद कोणाच्या वाट्याला येणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मुंबई येथे महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या निवडणुका पूर्ण झाल्या असल्या तरी आतापर्यंत महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले नव्हते. त्यामुळे नांदेडचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, याकडे सर्वच राजकीय दिग्गजांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत नांदेड महापालिकेत सुधाकर पांढरे, मंगला निमकर, गंगाधर मोरे, ओमप्रकाश पोकर्णा, अब्दुल शमीम बेगम, बलवंतसिंध गाडीवाले, प्रकाशचंद मुथा, अजयसिंह बिसेन, अब्दुल सत्तार, शैलजा स्वामी, शिलाताई भवरे, दीक्षा धबाले, मोहिनी येवनकर आणि जयश्री पावडे यांनी महापौरपद भूषविले आहे. आरक्षणाची सोडत जवळ आल्याने राजकीय हालचालींनाही वेग आला असून संभाव्य उमेदवारांकडून फिल्डींग लावण्यास सुरुवात झाली आहे.
Nanded Election Result 2026: नांदेड महापालिका पक्ष निहाय निकाल
एकूण जागा : 81
भाजप : 45
शिवसेना शिंदे गट : 04
राष्ट्रवादी अजित पवार : 01
काँग्रेस : 10
एमआयएम : 15
इतर : 06
आणखी वाचा