Amit Deshmukh on Municipal Corporation election results : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकालहाती येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, लातूरमध्ये काँग्रेसने जोरदार मुंसडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं बहुमताचा आकडा गाठला आहे. काँग्रेस आणि वंचितच्या युतीला लातूर पालिकेत 47 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसला 43 तर वंचितला चार जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 22 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. या विजयानंतर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले अमित देशमुख?
हा लातूरकरांचा विजय आहे. सुरुवातीपासूनच आम्ही सांगत होतो काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या पर्यायाला जनतेनं उचलून धरलं आहे. मतदारांनी आमच्या पारड्यात घवघवीत यश टाकल्याचे मत काँग्रेस आमदार अमित देशमुख म्हणाले. भाजपकडून लातूरचे भूमिपुत्र आदरणीय विलासराव देशमुख यांच्याबाबत जे वक्तव्य केलं त्यामुळं जनतेच्या भावना दुखावल्या. अशा वक्तव्याला लोकांनी कधीच पाठिंबा दिला नाही. वंचितने पाच पैकी पाच जागा जिंकल्या आहेत. या जागा कमी नाहीत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या गठबंधनला तळागाळातून पाठिंबा मिळत आहे. आम्हाला 40 च्या वर जागा मिळतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. आम्ही पारदर्शक कारभार करणार आहोत. राजकारणाचा स्तर आपण जपला पाहिजे भारतामध्ये अशी संस्कृतीला मान्यता मिळाली नव्हती असे देशमुख म्हणाले.
राज्यभरात भाजपची लाट असताना लातूरमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी
राज्यभरात भाजपची लाट असताना लातूरमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लातूरच्या जनतेनं मतपेटीतून विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या आहेत. काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला 37 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं आता लातूर महानगर पालिकेवर काँग्रेस आणि वंचितची सत्ता आली आहे. यानंतर अमित देशमुख यांनी एबीपी माजाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा लातूरच्या जनतेचा विजय असल्याचे मत व्यक्त केले.
लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या 70 जाागांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी 60 टक्के मतदान झालं होतं. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून 369 उमेदवार रिंगणात होते. एकूण 70 जागांपैकी विजयासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. 36 हा बहुमताचा आकडा आहे.
महत्वाच्या बातम्या: