MC Election News: राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत (Municipal Corporation Election 2025) अखेर मोठी घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (15 डिसेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सायंकाळी ४ वाजता पार पडली. कालच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आज अचानक आयोगाने पत्रकार परिषद बोलावल्याने, महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आयोगाकडून निवडणुकांच्या घोषणेला हिरवा कंदील मिळाल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
MC Election News: 29 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित
राज्यात सध्या एकूण 29 महानगरपालिका निवडणुका प्रलंबित आहेत. यासोबतच नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही रखडलेल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुदतवाढ देत 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची तयारी वेगाने सुरू केली होती. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, प्रशासकीय तयारी आणि निवडणूक यंत्रणेची आखणी पूर्णत्वाकडे गेल्याने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचे मतदान आणि निकाल कधी?
MC Election News: उत्तर महाराष्ट्रातील निवडणुका आणि एकूण जागा
- नाशिक महानगरपालिका - 122
- अहिल्यानगर महानगरपालिका - 68
- धुळे महानगरपालिका - 74
- जळगाव महानगरपालिका - 75
- मालेगाव महानगरपालिका - 84
MC Election News: निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
- नामनिर्देश स्वीकारण्याचा कालावधी : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- छाननी : 31 डिसेंबर
- माघारीची मुदत : 2 जानेवारी
- चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी : 3 जानेवारी
- मतदान : 15 जानेवारी
- मतमोजणी : 16 जानेवारी
MC Election News: आजपासून आचारसंहिता लागू
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेवर मर्यादा येणार आहेत. महापालिका निवडणुकांची घोषणा होताच सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून तयारीला वेग येत आहे. उमेदवार निवड, जागावाटप आणि प्रचार रणनिती यावर चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात राज्यातील शहरी राजकारण तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आणखी वाचा
