मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी "सुजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एकच वादा सुजय दादा! अशा घोषणांना संपूर्ण हॉल दणाणून गेला होता.


मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एमसीए पॅव्हेलियनच्या गरवारे बँक्वेट हॉलमधील सोहळ्यात, जोरदार शक्तप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला.

वडिलांच्या इच्छेविरोधात निर्णय : सुजय विखे पाटील



पक्षप्रवेश झाल्यानंतर सुरुवातीला सुजय विखे पाटील यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन निर्णय घेतला. संकटकाळी ज्यांनी मला साथ दिली, मी त्यांच्यासोबत आहे, असं सुजय यांनी यावेळी सांगितलं. तसंच अहमदनगर जिल्ह्यात भाजप पक्ष वाढवण्याचं काम करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

VIDEO | नगरच्या विखेंची नवी पिढी आता भाजपसोबत | मुंबई | एबीपी माझा



सुजय विखे अहमदनगरमधील भाजपचे उमेदवार : मुख्यमंत्री

सुजय विखे पाटील यांच्या रुपाने उमदं नेतृत्त्व भाजपमध्ये आलं आहे. आता अहमदनगर हा भाजपचा बालेकिल्ला होणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षप्रवेशानंतर दिली. तसंच लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील भाजपचे उमेदवार असतील, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र आपल्याला दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच बंड करुन सुजय विखेंनी निर्णय घेतला आहे. आज नाहीतर उद्या सुजय यांचाच निर्णय योग्य असल्याचं घरच्यांच्या लक्षात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.



अहमदनगरच्या जागेवरुन नाराजी

सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. मात्र ती जागा राष्ट्रावादी काँग्रेसकडे गेल्याने सुजय विखेंनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट आणि शिर्डी संस्थानचं उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

सकाळपासूनच प्रवेशाची लगबग

प्रवेशासाठी आज सकाळीच सुजय विखे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते. पाथर्डीचे आमदार शिवाजी कर्डीलेही शिवनेरी बंगल्यावर उपस्थित होते. शिवाय अहमदनगरमधील सर्व स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सुजय यांच्या स्वागतासाठी सज्ज रहा, असा निरोप पक्षश्रेष्ठीने दिला होता.

सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. मात्र ती जागा राष्ट्रावादी काँग्रेसकडे गेल्याने सुजय विखेंनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट आणि शिर्डी संस्थानचं उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

दिलीप गांधी समर्थकांचा विरोध

मात्र अहमदनगर लोकसभेचं तिकीट सुजय विखेंना दिल्यास विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे दिलीप गांधी समर्थकांनी सुजय विखेंच्या नावाला विरोध केला आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सुजय विखे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करत घोषणाबाजी केली होती. यामुळे मुख्यमंत्री नाराज झाल्याचं चित्र काल पाहायला मिळालं होतं.

अहमदनगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अहमदनगरची जागा सोडण्याबाबत विनंती केली होती. शरद पवार सुजय विखे यांचं महाआघाडीत योगदान काय? असा सवाल उपस्थित केला होता. शिवाय जागेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्यस्थी करणार असल्याचीही माहिती होती. मात्र शेवटपर्यंत जागेचा तिढा न सुटल्याने सुजय विखेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

विखे पाटील यांची नाराजी

सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चावरुन राधाकृष्ण पाटील यांना हायकमांडचं बोलावणं आलं होत. यावेळी त्यांनी अहमदनगरच्या जागावाटपासंबंधी तोडगा निघाला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातल्या अंतर्गत राजकारणाबद्दलही त्यांनी हायकमांडकडे तक्रार केली. विरोधी पक्षनेत्याची ही अवस्था होत असेल तर इतरांना काय सांगायचं? अशी उद्विग्न प्रतिक्रिया विखे पाटलांनी राहुल गांधींकडे व्यक्त केली. अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला होता.

संबंधित बातम्या

सुजय विखेंच्या प्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी, मुख्यमंत्री नाराज


सुजय विखे पाटलांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश


अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, विखे पाटलांचा गर्भित इशारा


सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल, शरद पवारांकडून 50 वर्ष जुन्या पवार-विखे संघर्षाची आठवण


आघाडीतील अहमदनगरचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार