Dhananjay Mahadik on Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत चारही घटक पक्ष सोबत असल्याने आणि 90 टक्के ठराव महायुतीकडेच असल्याने या निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. गोकुळच्या निवडणुकी संदर्भात मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडत असून, यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर महायुतीच्या अधिकृत पॅनेलची घोषणा केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळ निवडणूक, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोर्चा आणि एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाजपची भूमिका स्पष्ट केली.
गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नाही
गोकुळ निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांचा खासदार महाडिक यांनी जोरदार समाचार घेतला. "गोकुळ निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा कोणताही हस्तक्षेप नाही. गेल्या निवडणुकीच्या वेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना गोकुळच्या पॅनेलची घोषणा मुंबईतूनच झाली होती. तेव्हापासूनच हा पायंडा पडला आहे. आता महायुतीमध्ये चार प्रमुख पक्ष एकत्र असल्याने राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सतेज पाटील काय आरोप करतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही; पराभवाच्या नैराश्यातूनच ते असे आरोप करत आहेत," असा टोला महाडिक यांनी लगावला.
पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाची 25 वर्षे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'सेवाज्योत यात्रे'चे आयोजन करण्यात येत असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. 7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तर 26 मे 2014 रोजी त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. या 25 वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींनी देशातील 25 कोटी गरिबांना दारिद्र्यरेषेबाहेर आणले, 12 कोटी घरांमध्ये गॅस कनेक्शन दिले, 4 कोटी लाभार्थ्यांना 'आवास योजने'तून घरे दिली आणि 80 कोटी जनतेला मोफत रेशन देण्याचे ऐतिहासिक काम केले, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे आंदोलन हे 'फेक नॅरेटिव्ह'
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना महाडिक म्हणाले, "राहुल गांधींचे वर्तन नैराश्यातून सुरू आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसचा मुद्दा जनतेने आधीच खोडून काढला आहे. काँग्रेसने काल काढलेला मोर्चा हा 'फेक नॅरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न होता. ज्या 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेला काँग्रेस विरोध करत आहे, ती प्रक्रिया देशात यापूर्वी 10 वेळा झाली आहे आणि काँग्रेसच्या काळातही ती झाली होती. काँग्रेस सत्तेत असताना या प्रक्रिया चांगल्या आणि भाजप सत्तेत आल्यावर निवडणुका खोट्या, असा दुटप्पीपणा काँग्रेस करत आहे. त्यामुळे देशातील नागरिक काँग्रेसच्या या स्टंटबाजीला थारा देणार नाहीत."
MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्य सरकार
एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय मान्य केला. "पेपरफुटीचे जाहीर प्रकटन झाले असून यामध्ये काहींना अटकही झाली आहे. विद्यार्थ्यांच्या 12 मागण्या सरकारने आधीच पूर्ण केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर निलंबनाची आणि कठोर कारवाई केली जाईल. राज्य सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बाजूने असून आंदोलनाला सहकार्य करत आहे," असे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिले.
इतर महत्वाच्या बातम्या
