मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीवेळी शेकापचे आमदार जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे देखील उपस्थित होते. राजकीय विषय आणि ईव्हीएममधील घोटाळा यावर या सर्वांची चर्चा झाल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं.


विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार नसतील तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी मनसेनं भूमिका घेतली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार, जयंत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.


येत्या 9 ऑगस्ट रोजी 'ईव्हीएम चलेजाव' असा नारा देत विरोधकांनी मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात राज ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे.



1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त मी जयंत पाटलांना भेटायला आलो होतो. राज ठाकरे येथे येणार माहित नव्हतं. राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. ईव्हीएम आणि राजकीय विषयांवर ही चर्चा झाली, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.


ईव्हीएममध्ये निश्चित घोळ आहे. सत्तेचा गैरवापर सुरु असून ईडी आणि आयकर विभाग हे दोन 2 बलाढ्य कार्यकर्ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं काम करत आहेत, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.



आम्ही लोकसभेलाच आघाडी केली होती. विधानसभेला 49 जागेची तयारी ठेवली आहे. मात्र एवढ्या जागा मिळणार नाहीत याची कल्पना आहे. कारण इतर पक्षांना सुद्धा जागा वाटप करायच्या आहेत. सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावं आणि भाजपला रोकावं, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची असणार आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.