Mira Bhayandar Mayor Election: मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकांनंतर शहरातील राजकारणाने नवीन आणि वादग्रस्त वळण घेतले असून, “मराठी महापौर” या मुद्द्यावर सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याने, मीरा-भाईंदर महापालिकेला एमएमआरमधील पहिला अमराठी महापौर (Mayor) मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. या घडामोडीमुळे मराठी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह (MNS) मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे.
Mira Bhayandar Mayor Election: ‘मराठी महापौर’च्या मागणीला भाजपाचा नकार
गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडून सातत्याने मराठी महापौर देण्याची मागणी करण्यात येत होती. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, भाजपने महापौरपदासाठी डिंपल मेहता यांचे नाव पुढे करून हा इशारा साफ धुडकावल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांचे नाव भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे.
Mira Bhayandar Mayor Election: मराठी समाजात तीव्र असंतोष
भाजपाच्या या निर्णयामुळे मराठी समाजात असंतोषाची तीव्र लाट उसळली आहे. “मराठी माणसाचा वापर केवळ मतांसाठीच केला जातो का?” असा थेट सवाल मराठी एकीकरण समितीने उपस्थित केला आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा डावलल्याचा आरोप करत, समितीने भाजपाच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून देखील भाजपच्या भूमिकेचा विरोध केला जात आहे.
Mira Bhayandar Mayor Election: 3 तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा
या पार्श्वभूमीवर येत्या 3 तारखेला नेताजी सुभाष चंद्र बोस चौक ते मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाही सहभाग असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Mira Bhayandar Mayor Election: राजकीय वातावरण तापणार
एमएमआरमधील पहिल्या अमराठी महापौराच्या शक्यतेमुळे मीरा-भाईंदर शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आगामी काळात आंदोलन किती तीव्र होते? भाजप आपली भूमिकेवर काय स्पष्टीकरण देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
