मुंबई : ईशान्य मुंबईतील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपने मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेवरील टीका सोमय्यांना भोवल्याचं चित्र आहे.

मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना पक्षाने दिल्या होत्या. त्यामुळे किरीट सोमय्या यांची संधी हुकणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात होतं. मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेली टीका त्यांना भोवल्याचं म्हटलं जात आहे.

VIDEO | किरीट सोमय्यांना डच्चू, ईशान्य मुंबईतून भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी | मुंबई | एबीपी माझा


मनोज कोटक दोन दिवसांपासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मनोज कोटक यांच्या कार्यालयात भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसोबत ये-जा सुरु झाली आहे.
ईशान्य मुंबईतून निवडणुकीसाठी सज्ज राहा, मनोज कोटकांना पक्षाकडून संकेत

मनोज कोटक यांचा परिचय

मुंबईत भाजपचे मुलुंड मधील विद्यमान नगरसेवक

मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते

मनोज कोटक यांनी 2014 साली भांडुप विधानसभेतून निवडणूक लढवली होती

मनोज कोटक मुलुंडचेच रहिवासी असल्यामुळे किरीट सोमय्या यांना मुलुंड मध्येच आव्हान उभं ठाकलं

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांच्या उमेदवारीस स्थानिक शिवसेनेचं समर्थन

भाजपने किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटकांना तिकीट दिलं तर शिवसैनिक त्यांच्या पाठिशीच उभा असेल, असं शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. मनोज कोटक यांच्याशिवाय ईशान्य मुंबईतून भाजपकडून पराग शाह, प्रकाश मेहता आणि प्रविण छेडा यांची नावं चर्चेत होती.