कोलकाता :  पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कोलकाता येथे पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जींनी आज इंडिया आघाडी सरकार बनवण्याचा दावा करत नसली तरी उद्या करणार नाही, असं म्हणत मोठं वक्तव्य केलं आहे. एकीकडे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या शपथविधीची तयारी सुरु असताना ममता बॅनर्जींनी सरकार स्थापनेबाबत केलेल्या दाव्यामुळं राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरु झाले आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या निकालात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला चांगलं यश मिळालं आहे. नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेतल्यानंतर देशातील राजकीय स्थितीवर ममता बॅनर्जींनी भाष्य केलं. 


ममता बॅनर्जींनी यावेळी म्हटलं की, नरेंद्र मोदी यांना दोन तृतियांश बहुमत हवं होतं. लोकसभा निवडणुकीच्या निकालात त्यांना बहुमताचा आकडा देखील गाठता आला नाही, असं बॅनर्जींनी म्हटलं. आता ते संविधानात दुरुस्ती कशी करु शकतील? कारण त्यांच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे का असा सवाल ममता बॅनर्जींनी केला. गेल्या वेळी कोणतीही चर्चा न करता बिलं मंजूर करण्यात आली. मात्र, आता तसं ते करु शकणार नाहीत, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.


देशात बदलाची गरज, आम्ही स्थितीवर लक्ष ठेवून : ममता बॅनर्जी 


ममता बॅनर्जींनी देशात बदलाची आवश्यकता असल्याचं म्हटलं. आम्ही स्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं त्या म्हणाल्या. सीएए कायदा मागं घेतला जावा अशी मागणी देखील ममता बॅनर्जींनी केली. आम्ही ही मागणी संसदेत करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं.  आम्ही राजकीय स्थितीवर लक्ष ठेवत असून एनडीएचं सरकार कधीपर्यंत चालतं हे पाहणार असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलं. केंद्र सरकारनं पश्चिम बंगालचे सर्व पैसे द्यावेत,असंही त्यांनी म्हटलं.


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होऊ नये, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं.  ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार का  असं विचारण्यात आलं असता त्यांनी अजून निमंत्रण मिळालेलं नाही आणि जाणार देखील नसल्याचं म्हटलं. 


तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत संसदीय पक्षाच्या अध्यक्षा म्हणून ममता बॅनर्जींची निवड करण्यात आली. तर, सुदीप बंडोपाध्याय हे तृणमूल काँग्रेसचे गटनेते असतील. तर,काकोली घोष दस्तदीर हे उपनेते असतील. कल्याण बॅनर्जी टीएमसीचे व्हीप म्हणून काम पाहतील. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं 42 पैकी 29 जागांवर विजय मिळवला आहे.


संबंधित बातम्या :


EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला


Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले