Malegaon Election Results 2026: मालेगाव महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर (Malegaon Election Results 2026) शहराच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या इस्लाम पार्टी (Islam Party), समाजवादी पार्टी (Samajwadi Party) यांच्या ‘मालेगाव सेक्युलर फ्रंट’ने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली 43 ही मॅजिक फिगर गाठण्याच्या दृष्टीने राजकीय पातळीवर हालचाली गतिमान केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर इस्लाम पार्टीने शिवसेना (शिंदे गट) आणि एमआयएम यांना बिनशर्त पाठिंब्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मालेगावमध्ये कोणते नवे राजकीय समीकरण जुळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टीने 35 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली, तर समाजवादी पार्टीने 5 जागा मिळवत फ्रंटची ताकद 40 वर नेली आहे. बहुमतासाठी केवळ तीन जागांची गरज असल्याने सत्तास्थापना शक्य करण्यासाठी चर्चांचे फेरे सुरू झाले आहेत.
Malegaon Election Results 2026: इस्लाम पार्टीसोबत चर्चा करण्यास तयार : मौलाना मुफ्ती
दुसरीकडे, राज्यभरात एमआयएमने जोरदार कामगिरी केली असली, तरी मालेगावमध्ये मात्र त्यांची घोडदौड रोखली गेली. एमआयएमला केवळ 21 जागांवर समाधान मानावे लागले असून, हा त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी स्पष्ट भूमिका मांडत, “कोणत्याही परिस्थितीत फिरकापरस्त (सांप्रदायिक) पक्षांसोबत सत्ता स्थापन केली जाणार नाही. मात्र, शहराच्या विकासासाठी इस्लाम पार्टीसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत,” असे सांगितले आहे.
Malegaon Election Results 2026: मालेगावात कोणत्या पक्षांची युती होणार?
याशिवाय, गेल्यावेळचा महापौरपद पूर्वला आणि उपमहापौरपद पश्चिमला हा फॉर्म्युला यावेळीही पुन्हा लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील 29 महापालिकांमध्ये एमआयएमने 100 पेक्षा अधिक जागा मिळवत मोठी झेप घेतली असली, तरी मालेगावमध्ये नव्याने स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीने एमआयएमला जोरदार धक्का देत राजकीय समीकरण बदलून टाकले आहे. आता मालेगाव महापालिकेची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार, आणि कोणत्या पक्षांची युती आकाराला येणार? याबाबत शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Malegaon Election Result 2026 : पक्षनिहाय निकाल (एकूण 84 जागा)
इस्लाम पार्टी – 35
समाजवादी पार्टी – 5
शिवसेना (शिंदे गट) – 18
एमआयएम – 21
काँग्रेस – 3
भाजप – 2
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा