Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदा राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच आता अनेक पक्षांनी आपापल्या याद्या जाहीर केल्या आहेत. यंदा विधानसभेच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. अशातच मनसेनं देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदाच्या विधानसभेत आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मनसेकडून माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सदा सरवणकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकरांची विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत एकदाही ते पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे आता शिवसेनेच्या सदा सरवणकरांना पहिल्यांदाच लढणाऱ्या अमित ठाकरेंचं आव्हान असणार आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


माहीमध्ये वर्चस्व, एकदाही पराभव पाहिलेला नाही, अशा सरवणकरांचं अमित ठाकरेंसमोर आव्हान


शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. माहीम, दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं काम सदा सरवणकरांनी केलं आहे. शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. तसेच, सरवणकर सर्वात आधी नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर सरवणकरांनी शिवसेनेकडूनच आमदारकीची निवडणूक लढवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंची कास धरली. ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक असणारे आमदार ठाकरेंची साथ सोडून सदा सरवणकर शिंदे गटात सामील झाले. 


सदा सरवणकरांची कारकिर्द 


आजवर एकदाही पराभूत न झालेले माहीम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर. काही दिवसांपूर्वीच सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरेंचे विश्वासू असलेले सरवणकर सध्या शिंदे गटात आहेत. शिंदे गटाकडून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. 


सदा सरवणकर 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये मात्र सदा सरवणकरांनी तिकीट नाकारत पक्षाकडून आदेश बांदेकरांना तिकीट देण्यात आलं. त्यावेळी नाराज सदा सरवणकरांनी शिवसेनेची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2009 ची निवडणूक लढवली. पण, या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली. त्यानंतर 2012 मध्ये सरवणकरांनी काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी केली. त्यावेळी माहिम दादर विधानसभेत शिवसेनेची पकड फारशी मजबूत राहिलेली नव्हती. त्यावेळी पक्षाकडून सदा सरवणकरांवर पक्षबांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली. सरवणकरांवर विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर सर्वात आधी 2014 मध्ये आणि त्यानंतर 2019 मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले. 


माहीममध्ये ठाकरेंची भूमिका गेम चेंजर? 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं  राज ठाकरे यांच्या मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आणि विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तसंच आदित्य ठाकरेंना टक्कर देण्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघात संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा मनसेनं केली आहे. आता माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्याचं कारण असं की, ज्यावेळी आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यावेळी राज ठाकरेंनी आपला पक्ष मनसेकडून पुतणे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे पुतणे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर आता माहीम मतदारसंघातून ठाकरे गट माघार घेणार की, उमेदवार उभा करणार? की, माहीमची जागा मित्रपक्षाला सोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


अखेर अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी... 


गेल्या बऱ्याच काळापासून अमित ठाकरे राजकारणात सक्रीय आहेत. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीपासूनच अमित ठाकरे राजकारणात एन्ट्री घेणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. अमित ठाकरेंसाठी दोन जागांची चाचपणी सुरू आहे. सध्या त्यांनी दोनपैकी कोणत्या जागेवर निवडणूक लढवायची याबाबत विचारमंथन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्यासाठी मुंबईतील माहीम आणि भांडुप पश्चिम विधानसभा जागांचा आढावा घेतला जात होता. पण अखेर अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


राज ठाकरेंची परतफेड उद्धव ठाकरे गट करणार? 


2019 मध्ये पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. वरळी विधानसभेतून निवडणूक लढवून आदित्य ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्यानं वरळीमधून विजय मिळवला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणापलीकडे कौटुंबिक नातं जपत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे माहीममधून जर अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवार देण्यात येऊ नये, असा एक मतप्रवाह शिवसेना ठाकरे गटात आहे. अर्थात, या संदर्भातील सर्वाधिकार राज ठाकरे यांचा असणार आहे. अमित ठाकरे  निवडणुकीच्या रिंगणात असतील की नाही याचे उत्तर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. 


माहीममध्ये मनसेच्या उमेदवारांना आतापर्यंत किती मतं मिळालीत?


2009 विधानसभा निवडणूक 2024


नितीन सरदेसाई  : 48,734 : विजयी 


2014 विधानसभा निवडणूक 2024


नितीन सरदेसाई : 40,350 : पराभूत


2019 विधानसभा निवडणूक 2024


संदीप देशपांडे : 42,690 : पराभूत