मुंबई : भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. कारण, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागांवर विजय मिळूनही त्यांना विरोधात बसावे लागले होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय भाजपने त्यांच्या नेतृत्वात लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, भाजपने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सगल तीन टर्म शतकेपार झेंडा फडकवला आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाला 2014, 2019 आणि 2024 या कालावधीत सलग 3 वेळा स्प्ष्ट बहुमत मिळाले आहे. तर, 2014 मध्ये भाजपला 123 जागा, 2019 मध्ये 105 आणि 2024 मध्ये 100 पेक्षा जास्त जागांवर भाजपचा विजय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे,आजच्या विजयानंतर भाजपने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. विशेष म्हणजे सलग 3 वेळा भाजपाला शंभरीपार नेण्याचा पराक्रम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला आणि नेतृत्वाला जमलेला नाही. त्यामुळे, हे यश महत्वाचं मानलं जातं.
देवेंद्र फडणवीस 2014 ला राज्याचे मुख्यमंत्री होते, पण, 2019 ला उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करत मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. त्यानंतर, फडणवीसांनी पक्षाला पुन्हा उभारी देत स्वत:तला आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रापुढे नेलं. पुन्हा राजकीय समीकरणे जुळवून आणत आणि दोन पक्षात फूट पाडून राज्यात महायुतीचे सरकार आणले. मात्र, पक्षाच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले होते. त्यानुसार, त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत भाजपला पुन्हा एकसंघ बांधण्याचा प्रयत्न केला.
लोकसभेतील दारुण पराभवानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ता खचला होता. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने जागावाटप ते प्रचारयंत्रणा संपूर्ण अधिकार फडणवीसांना देत विश्वास ठेवला. पक्षनेतृत्वाच्या या संधीचे सोनं करुन दाखवत देवेंद्र फडणवीसांनी भाजपला मोठा विजय मिळवून दिला. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. आजच्या निकालामुळे पुन्हा एकदा भाजपचं राज्यातील नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे दिसून आले. दरम्यान, महाराष्ट्रात2014 ते 2019 या कालखंडात पायाभूत विकासाला मोठी चालना मिळाली होती. त्या काळातील अनेक प्रकल्प 2022 ते 2024 या कालखंडात पूर्णत्वास गेले. भाजप नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक हिंदूत्त्ववादी चेहराही या विधानसभा निवडणुकीने अनुभवला. त्यामुळेच, देवेंद्र फडणवीस यांनी विजयी झाल्यानंतर एक है तो सेफ है... असे ट्विट करत विजयाचं निरीक्षणच एकप्रकारे नोंदवल्याचं दिसून येत आहे.