Ram Satpute : रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinh Mohite-Patil)  हे कागदोपत्री भाजपचे आमदार आहेत. मात्र, त्यांनी पक्षविरोधी केलेले काम राज्य आणि देशाच्या नेत्यांनी पाहिल्याचे वक्तव्य माळशिरसचे भाजपचे पराभूत आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी केलं.  भाजपच्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर याचे परिणाम गंभीरपणे भोगावे लागतील असा थेट इशारा भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांसह विद्यमान आमदार उत्तम जानकर (MLA Uttam Jankar) यांना दिला. राम सातपुते यांनी मोहिते पाटील कुटुंबावरही सडकून टीका केली. ज्यांना सगळे दिले त्यांनी भाजपाला दगा दिला असे सांगत पक्ष याची नक्की दखल घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


एका बाजूला राज्यभर विजयी उमेदवारांच्या रॅली निघत असताना माळशिरसमध्ये मात्र पराभूत उमेदवार राम सातपुते यांची विशाल सभा पार पडली. या सभेत बोलताना मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या दोन मोठ्या शक्ती एकत्र येऊन त्यांनी साम दाम दंड भेद अशा सर्व गोष्टीचा वापर निवडणुकीत केला. मात्र भाजपच्या फाटक्या कार्यकर्त्यांनी 1 लाख 8 हजार एवढे प्रचंड मतदान केल्याने हा मोहिते आणि जानकर यांचा पराभव असल्याचे सातपुते यांनी सांगितले. 


संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाने भाजपच्या विरोधात पूर्ण ताकद लावली


रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे कागदोपत्री आमदार असून त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाने भाजपच्या विरोधात पूर्ण ताकद लावून काम केले. हे सर्व भाजपच्या राज्यातील आणि देशातील नेत्यांनी पाहिले आहे. याबाबत पक्ष लवकरच योग्य भूमिका घेईल असे सांगत माझ्या एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सातपुते यांनी दिला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असून माळशिरस या परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील नेत्यांशी संपूर्ण चर्चा झालेली आहे  आता भाजप अजून जोमाने येथे कामाला लागणार असून आमच्या कार्यकर्त्याला धमकावण्याचे किंवा मारहाणीचे प्रयत्न जर कोणी केले तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असे वारंवार सातपुते यांनी सांगितले.  यावेळी माळशिरस तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सातपुते यांच्या निवासस्थानी जमले होते. 


देवेंद्र फडणवीसांनी मोहिते पाटलांना मदत करुनही त्यांनी भाजपविरोधी काम केले 


राज्यातील संपूर्ण एकतर्फी वाटत असणाऱ्या माळशिसरच्या या निवडणुकीत सातपुते यांनी गेले 15 दिवस माध्यम आणि मोठ्या सभांपासून लांब राहत केवळ गाठीभेटी आणि बैठका यावर जोर दिला होता. मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या माळशिरस तालुक्यातल्या दोन मोठ्या शक्ती एकत्र आल्याने किमान लाखाने सातपुते पराभूत होतील अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र जनतेला ज्या पद्धतीने सातपुते यांनी विश्वासात घेतले ते पाहता 1 लाख 8 हजार पेक्षा जास्त मिळालेले मतदान हे त्यांच्या या स्ट्रॅटेजीचे फलित ठरले. आता निवडणुकीनंतर भाजपच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाल्याचे कानावर येतात. सातपुते यांनी सर्व कार्यकर्त्यांची सहभाग घेत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना थेट इशारा दिला आहे. सातपुते यांनी आपल्या भाषणात आपला रोष मोहिते पाटील यांच्यावर ठेवत विधान परिषदेचे आमदारकी, साखर कारखान्याला झालेली मदत आणि इतर अनेक प्रकारच्या मदती फडणवीस यांनी देऊनही मोहिते पाटील यांनी भाजपविरोधी काम केले आहे. त्याचे परिणामही दिसतील असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितलं. आता त्यांनी थेट कार्यकर्त्यांना दमबाजी झाल्यास त्याचे गंभीर परिणामही भोगायची तयारी ठेवा असा इशाराही दिला.