Rajendra Raut : माजी आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या बार्शीतील घरासमोर आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळावर खुद्द राजेंद्र राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काल आगळगाव येथे आमची सभा होती. तिकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्यामुळं कोणाच्या बापाचा रस्ता आहे असं कोणी समजू नये, असे राऊत म्हणाले. हा रस्ता सरकारचा आहे कोणाची जहागिरी नाही असे राऊत म्हणाले. आमचे कार्यकर्ते सभेला येत असताना प्रतिस्पर्धीं उमेदवार दिलीप सोपल यांचे भाऊ हे घराबाहेर येऊन अश्लील हावभाव करत होते असे राऊत म्हणाले. 


तरुण अश्लील चाळ्यांना उत्तर देणार


78 वय वर्ष असलेल्या माणसाला लाज वाटली पाहिजे की तरुण कार्यकर्त्यांना वेड्यावाकड्या खुणा करुन डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळं या अश्लील चाळ्यांना उत्तर देण्याचे काम तेथील तरुणांनी केल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं दहशत माजवण्याचा आरोप अत्यंत चुकीचा असल्याचे राऊत म्हणाले. असे अश्लील चाळे करण्यात तुमचं आयुष्य गेलं त्यामुळे जनता तुम्हाला उत्तर देईल असेही राऊत म्हणाले. 


तरुण वर्गाला तुम्ही उचकवत असाल तर ते तुम्हाला प्रत्युत्तर देणार 


माझा मुलगा वकील आहे, त्यामुळे तो दहशत माजवण्याचा प्रश्नच येत नाही. माझा मुलगा रणवीरवर हल्ले केले रक्तबंबाळ केले, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, तालुका दहशतीत ठेवला. त्यामुळं आता जनता तुम्हाला चारी मुंड्या चीत करत असताना दारातून जाणाऱ्या जनतेत तुम्हाला दहशत दिसत आहे. तरुण वर्गाला तुम्ही उचकवत असाल तर ते तुम्हाला प्रत्युत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले. 


बार्शीत पुन्हा दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत यांच्यात लढत


विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन्हीकडीन बाजुचे उमेदवार पुन्ही आम्हीच निवडून येणार असल्याचा दावा करत आहेत. अशातच बंडखोर उमेदवारांनी नेत्यांटी चिंता चांगलीच वाढवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला मतदारन प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्रातील सत्तेच्या समीकरणाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील लढतीकडं मात्र, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मैदान तेच उमेदवारही तेच रिगंणात आहेत. पुन्हा दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत यांच्यात लढत होत आहे.