Maharashtra Vidhan Sabha: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. त्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या आणि नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधीचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागली आहे. अशातच मुख्यमंत्री पदासाठी पक्षांमध्येही चुरस आहे. दरम्यान विद्यमान विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्याने राज्यात मध्यरात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागेल, ही धारणा चुकीची असल्याची माहिती आहे. 26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे किंवा नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणे बंधनकारक नाही. यापूर्वी अनेकदा विधानसभेची मुदत संपल्यानंतर झाले मुख्यमंत्र्यांचे शपथविधी झाले आहेत.


दहावी विधानसभेची मुदत 19 ऑक्टोबर 2004 रोजी संपली. 11व्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 1 नोव्हेंबर 2004 रोजी झाला होता. अकराव्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2009 रोजी संपली. बाराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 7 नोव्हेंबर 2009 रोजी झाला होता. बाराव्या विधानसभेची मुदत 31 आॅक्टोबर 2024 रोजी संपली. तेराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 8 नोव्हेंबर 2014 रोजी झाला. तेराव्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपली. चौदाव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर 2019 रोजी झाला. राज्यात सरकार स्थापन होण्यात वेळ त्यामुळेच घेतला जात आहे. 26 तारखेपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात आले पाहिजे, असे कोणतेही संवैधानिक बंधन नाही. 


विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती


14 व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्याआधी 15 वी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. यासंदर्भात आता नोटिफिकेशन काढलं जाईल. नोटिफिकेशन निघाल्यानंतर संविधानात्मकरित्या 15 वी विधानसभा अस्तित्वात आली, असं मानलं जाईल. त्यानंतर महायुतीकडून बहुमताचे आकडे आणि सह्या घेऊन सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा जाईल.  त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून निमंत्रण देण्यात येईल.


निवडणूक आयोगाचे अधिकारी घेणार राज्यपालांची भेट


या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार आहे.  सोबतच, निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली जाणार आहे.  त्यानंतर राज्यपालांकडून 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होणार आहे.


शिवसेना शिंदे गटाची बैठक


दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) राज्यभरातील आमदार मुंबईत यायला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज अॅन्ड लॅड्समध्ये आतापर्यंत 29 आमदार दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या हॉटेलमध्ये सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार आहे.