पुणे: आज अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाकडून सर्व ग्रामीण, शहरी भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. 20 नोव्हेंबर निवडणुका पार पडतील, तर 23 नोव्हेंबर मतमोजणी पार पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील 20 नोव्हेंबर निवडणुका पार पडतील, तर 23 नोव्हेंबर मतमोजणी होणार आहे, राज्यातील सर्व जागांसाठी एकच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.


विधानसभा निवडणूक ठरणार चुरशीची


लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरणार असल्याचं चित्र आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणाचा देखाल या विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे,  महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत दिसून येणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या फुटीमुळे निर्माण झालेले दोन गट आणि मराठा आरक्षण यांचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे आणि या घटकांचा निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर आता जागावाटपावरून मोठ्या घडामोडींची शक्यता आहे. 


असं असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक -


निवडणुकीचं नोटिफिकेशन :  22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 
मतदान  : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर  2024


288 जागांसाठी किती मतदार असतील? 


एकूण मतदार - 9 कोटी 63 लाख
नव मतदार - 20.93 लाख
पुरूष मतदार - 4.97 कोटी
महिला मतदार - 4.66 कोटी
युवा मतदार - 1.85 कोटी
तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार - 6.32 लाख


महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?


एकूण मतदान केंद्र - 1 लाख 186 
शहरी मतदार केंद्र - 42,604 
ग्रामीन मतदार केंद्र - 57,582 
महिला अधिकाऱ्यांची केंद्रे - 
एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार - 960
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. 


मतदारांसाठी सुविधा पोर्टल ॲप 


निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने ॲप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.