Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Result 2024) चा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या विधानसभेत महायुती (Mahayuti) घवघवीत यश मिळवत सत्तेची चावी आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरली. तर, महाविकास आघाडीला (Maha Vikas Aaghadi) दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पण, यंदाच्या विधानसभेत सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. मतदारांनी महायुतीच्या पदरात मतांचं दान टाकलं खरं, पण त्यासोबतच अनेक विद्यमान आमदारांना पराभवाची चव चाखायला भाग पाडलं. अनेक ठिकाणी तर मतदारांनी प्रस्थापितांचा पुरता धुव्वा उडवला. यंदाच्या निवडणुकीत तब्बल 65 आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच काय तर, तब्बल 6 आमदारांचं तर डिपॉझिटही जप्त झालं आहे. 


महाराष्ट्राच्या चौदाव्या विधासभेतील तब्बल 185 आमदार पुन्हा पंधराव्या विधानसभेत दिसणार आहेत. 250 आमदारांनी पुन्हा निवडणूक लढवली, त्यापैकी 65 आमदारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, तब्बल 6 आमदारांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. या पराभूत आमदारांमध्ये सर्वाधिक 19 काँग्रेसचे, तर राष्ट्रवादीचे (अजित गट) 10  आमदार निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर, शरद पवारांचे 8 आणि उद्धव गटाचे 7 आमदार पुन्हा जिंकू शकले नाहीत. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या 6, भाजपचे 5, बहुजन विकास आघाडीचे 3, प्रहारचे 2, एमआयएम आणि मनसेच्या एका आणि तीन अपक्ष आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. या सर्व आमदारांना मतदारांनी नाकारल्याचं निवडणूक निकालांमध्ये स्पष्ट झालं. 


शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात तर सर्वाधिक 20 विद्यमान आमदार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर विदर्भातील 12 आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईतील 8 आमदारही निवडणूक जिंकू शकले नाहीत. 


मुंबईतील 'या' विद्यमान आमदारांचा दारुण पराभव 


मुंबईतही अनेक प्रस्थापित विद्यमान आमदारांना मतदारांनी पराभव चाखायला भाग पाडलं. त्यात वर्सोव्यातून भारती लवेकर, भायखळ्यातून यामिनी जाधव, माहीममधून सदा सरवणकर, वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दिकी, चेंबूरमधून प्रकाश फातेर्पेकर, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, भांडुपमधून रमेश कोरगांवकर  आणि आपला मतदारसंघ सोडून मानखुर्दमधून निवडणूक रिंगणात उतरलेले नवाब मलिक यांचाही निवडणुकीच्या रिंगणात दारुण पराभव झाला. 


'या' विद्यमान आमदारांचं डिपॉझिटही जप्त 


निवडणूक रिंगणात उतरलेल्या विद्यमान आमदारांपैकी काही आमदारांचा तर पार सुपडा साफ झाला. सहा आमदारांना एकूण मतांपैकी 16 टक्के मतंही मिळवता आली नाहीत. त्यात मीरा-भाईंदरमधून गीता जैन, मानखुर्दमधून नवाब मलिक, मेळघाटमधून राजकुमार पटेल, मोर्शीतून देवेंद्र भुयार, गेवराईतून लक्ष्मण पवार आणि आष्टीमधून बाळासाहेब आजबे यांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


राज्यातील सत्तास्थापन लांबणीवर? मुख्यमंत्रीपदी कोण, तिढा कायम; 27, 28 नोव्हेंबरला महायुती सरकार स्थापन होण्याची शक्यता