संगमनेर : काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून (Sangamner Vidhan Sabha Election 2024) धक्कादायक पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10 हजार 560 मतांनी पराभव करत विजय मिळवला. यानंतर अमोल खताळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


अमोल खताळ म्हणाले की, माझा विजय हा संगमनेर मतदारसंघातील लाडक्या बहिणी, युवक आणि ज्येष्ठ वर्गाला मी समर्पित करतो. संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने ही निवडणूक हातात घेतली. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक झाली. गेला दीड वर्षापासून मी या मतदारसंघात काम करत आहे. त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला या मतदारसंघातील दहशत थांबवायची होती. या विजयानंतर दहशत थांबवण्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालोत. येणाऱ्या काळात विकासाचे राजकारण या मतदारसंघात केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. 


मला जनतेने निवडून दिलं


बाळासाहेब थोरात यांनी मी नवव्यांदा आमदार होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. पण तुम्ही त्यांना रोखण्यात यशस्वी ठरलात, असे विचारले असता अमोल खताळ म्हणाले की, मला जनतेने निवडून दिलं. जनतेने 40 वर्षापासून यांची दहशत, दादागिरी सोसली, इतकी वर्ष तुम्ही मंत्री असून तुम्हाला संगमनेरमधील पाणी प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, वाडे, वस्त्यांवरील रस्त्यांचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे ते स्वप्नात जगत होते, असा टोला त्यांनी बाळासाहेब थोरातांना लगावला. 


संगमनेर भयमुक्त होणे गरजेचे होते


बाळासाहेब थोरातांनी विखेंच्या पराभवासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद लावली होती. मात्र, विखे निवडून आले आणि थोरात पडले, असे विचारले असता अमोल खताळ म्हणाले की, हे तर सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्यात त्यांना अपयश येणारच होतं. कारण संगमनेर भयमुक्त होणे गरजेचे होते. भयमुक्त होण्यासाठी लोकांनी मला मतदान केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


संगमनेरच्या जनतेने घेतला सुजय विखेंच्या पराभवाचा बदला


सुजय विखेंनी तुमच्यासाठी घेतलेल्या सभांचा कितपत परिणाम झाला, असे विचारले असता ते म्हणाले की, सर्वात जास्त फायदा मला सुजय विखेंनी घेतलेल्या सभांचा झाला, असेही अमोल खताळ यांनी म्हटले. तर सुजय विखेंच्या पराभवाचा तुम्ही बदला घेतला असे वाटते का? असे विचारले असता ते म्हणाले की, हा बदला मी घेतला नाही, हा बदला संगमनेरच्या तमाम जनतेने घेतला आहे. कारण त्यांना विकासाकडे जायचे होते. मी संगमनेरमध्ये उमेदवारी भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार उभे राहिले. दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आली. मात्र त्यावेळेस त्यांच्या लक्षात यायला हवा होतं की, ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. मी मतदारसंघात फिरल्यानंतर मलाही जाणवले की, 40 वर्षांत येथील लोकप्रतिनिधी वाड्या वस्तीवर पोहोचलेच नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. 



आणखी वाचा 


Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?