मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्ष आपल्या प्रचार सभा, दौरे, रॅली, जाहीरनामे प्रकाशित करत आहेत, अनेक पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाचा जाहीरनाम्यात प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी 'आम्ही हे करू' या यावाने आपला जाहीरनामा प्रकाशीत केला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष्य देण्यात आलं आहे.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकाच दिला आहे. पण, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 19 वर्ष झाले आहे. या 19 वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती दिली आहे.
मी 2006 रोजी राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती 2014ला आली. पण या काळात मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. 2014ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षात ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचं कारण विषय बदलले नाहीत प्रश्न बदललेले नाहीत अद्यापही तेच प्रश्न आहेत अद्यापही आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत म्हणून मला असं वाटतं की आज हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे.
आज आमच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांना किंवा नेत्यांना मी इथे बोललो नाही कारण ते आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत त्यामुळे मी त्यांना त्रास दिला नाही इथे बोललेला नाही असे पुढे राज ठाकरे म्हणाले.
जाहीरनाम्यात काय?
जाहिरनाम्यात पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेने आपण जाहीरनामा समोर ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.
शिवसेना ठाकरेंच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्यभरात शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करणार, असे म्हटलं आहे. पण त्याऐवजी राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचे आहे आणि राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. महाराष्ट्रात चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मग शिवाजी महाराजांच्या मंदिरांची गरज काय? त्याऐवजी राज्यातील मुलांना शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यात 'लाडकी बहीण योजना' किंवा 'महालक्ष्मी योजना' यासारख्या योजनांचा समावेश का नाही, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, 'याचं कारण महाराष्ट्राचं एकूण आर्थिक गणित पाहिल्याशिवाय मी असल्या घोषणा करु शकत नाही. असल्या घोषणांना अर्थ नसतो. महाराष्ट्रावर आर्थिक बोजा न येता या योजना सुरु राहिल्या तर मी त्याला गिफ्ट म्हणेन. पण उद्या या गोष्टी सुरु राहिल्या नाहीत तर मी या योजनांना लाच म्हणेल. अशा योजना सुरु करताना राज्याचा आर्थिक ढाचा बिघडता कामा नये. सरकारकडून महिलांना पैसे मिळतात, याचा आनंदच आहे. पण या सगळ्यातून आपण काही वेगळे खड्डे तर खणून ठेवत नाही ना, हेदेखील तपासले पाहिजे'.
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द
राज ठाकरे यांची 17 तारखेला शिवाजी पार्कवर सभा होणार होती. मात्र, ती सभा रद्द करण्यात आल्याची माहिती राज ठाकरे यांनी आज दिली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'माझी 17 तारखेला शिवाजी पार्कवरची सभा आहे, पण ती आता होती म्हणावी लागेल. करण त्यासाठी सरकारकडून जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठिण झालं आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत', असं ते म्हणालेत.