नागपूर : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhan Sabha Election 2024) वातावरण ढवळून निघालं आहे. सगळेच प्रमुख पक्ष घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. या मतदारसंघात फडणीवस जिंकणार का? जिंकले तर त्यांना किती मताधिक्य मिळेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी नागपूरमध्ये महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) चांगलाच जोर लावला आहे. त्याचीच प्रचिती आता आली आहे. उमेदवारी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नेमका किती खर्च केला हे समोर आले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) तुलनेत चार पट खर्च केला आहे.
प्रफुल्ल गुडधे यांच्याकडून तीन लाख खर्च
या विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नेमका किती खर्च केला, याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोणी किती खर्च केला, हे समोर आले आहे. या माहितीनुसार नागपूर शहरात आतापर्यंत निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी 64 हजार 136 रुपये खर्च केले आहेत. तर त्यांचे प्रतिद्वंदी प्रफुल्ल गुडधे यांनी आतापर्यंत 2 लाख 99 हजार 581 रुपये प्रचारात खर्च केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण चार पटीपेक्षाही जास्त होते.
बंटी शेळके यांच्याकडून सर्वांत कमी खर्च
दुसरीकडे निवडणूक खर्चात दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव नागपुरात सर्वात आघाडीवर आहेत. पांडव यांनी प्रचारावर आतापर्यंत 6 लाख 56 हजार 675 रुपये खर्च केले आहेत. उत्तर नागपूरमधील भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी 4 लाख 17 हजार 617 तर मध्य नागपुरातील प्रवीण दटके यांनी 3 लाख 56 हजार 98 रुपये खर्च केले आहेत. नागपूर शहरातील सहा मतदारसंघात सर्वात कमी खर्च मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केला आहे. त्यांनी प्रचारासाठी आतापर्यंत 44 हजार 243 रुपये खर्च केले आहेत.
मी काय पाकिस्तानमधून आलो का, सुधाकर कोहळेंचा सवाल
मी काय पाकिस्तान मधून आलेला उमेदवार आहे का? मी नागपूरचा रहिवाशी असून पश्चिम नागपूरमधून पक्ष आदेशावर निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया पश्चिम नागपूरमधील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी दिली आहे. सुधाकर कोहळे पश्चिम नागपूरसाठी भाजपचे उमेदवार असून त्यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून विरोधी पक्षाकडून (काँग्रेसकडून) घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे..त्या पार्श्वभूमीवर सुधाकर कोहळे यांनी मी पाकिस्तानमधून आलेला उमेदवार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस मला बाहेरचा उमेदवार कसं म्हणू शकते?
पश्चिम नागपूरमधील विद्यमान आमदार आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे हेसुद्धा पश्चिम नागपूरच्या बाहेरचे रहिवाशी असून ते दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये राहतात आणि पश्चिम नागपूरमध्ये निवडणूक लढवतात. असे असताना काँग्रेस मला बाहेरचा उमेदवार कसं म्हणू शकते, असा सवालही सुधाकर कोहळे यांनी विचारला आहे. पश्चिम नागपूरमध्ये भाजपचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
हेही वाचा :
जयंत पाटलांना पाडणं एवढं सोपं नाही, अजून बारामतीत गेलो नाही, जयंत पाटलांचं अजितदादांना थेट आव्हान!