पुणे: लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीला बारामतीमधील जनता कोणत्या पवारांच्या पाठीशी उभी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताणा दिसणार आहे. अजित पवारांनी आज बारामतीमध्ये गावभेट दौऱ्यावर असताना शरद पवारांनंतर बारामतीकरांसाठी वाली कोण आहे, असा सवाल करत मतदारांना आवाहन केलं आहे. काही भावनिक झालात तर त्यांची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल, परत बारामतीकरांना पुन्हा वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं मी दीड वर्षांनी निवडणूक लढविणार नाही आणि खासदार पण होणार नाही, त्यानंतर कोण बघणार आहे, त्यावर लक्ष्य द्या असं अजित पवार म्हणालेत, त्यावर शरद पवारांनी चोख उत्तर दिलं आहे.
शरद पवारांनी अजित पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, 'लोकांनी गंमत काय केली. त्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान केलं. त्यांना मतदान केलं नाही एवढंच ना. लोकांचा अधिकार आहे. लोकांनी कुणालाही मतदान केलं. उद्या कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख. म्हण बाबा माझी काय तक्रार. लोकांनी म्हटलं पाहिजे ना. मी म्हणून काय उपयोग', अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
बारामतीमध्ये गावभेट दौऱ्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'आम्ही नवीन लोकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 2 कोटी 30 लाख महिलांना थेट खात्यावर पैसे देतोय. झिरो बिल सर्वांना येणार आहे. हे करण्याकरता आपल्याला पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात आणणं गरजेतं आहे. त्यासंदर्भात तुम्ही नेहमीच मला साथ दिली. पुन्हा एकदा मला आता साथ द्या. लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमत होईल. मी खोटं सांगत नाही, तुमच्या लक्षात येत नाही, काही भावनिक झालात तर त्यांची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल, परत बारामतीकरांना पुन्हा वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं मी दीड वर्षांनी निवडणूक लढविणार नाही आणि खासदार पण होणार नाही, त्यानंतर कोण बघणार आहे, त्यावर लक्ष्य द्या, कोण काम करेल त्याकडे पाहा', असंही यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे.
मी काकींना विचारणार नातवाचा पुळका...
अजित पवार म्हणाले, 'मला तुम्ही 91 पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाताई कधी बाहेर आल्या आहेत का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी होती. त्यांनी वाटोळं केलं बारामतीचं, फार बाद झाला, याच्या हातात बारामती दिली तर वाट लावेल असं काही असतं तर गोष्ट वेगळी असती. मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तुम्हाला. आत्ता विचारण्याची वेळ नाही', असंही पुढे अजित पवार म्हणालेत.