पुणे: मावळ पॅटर्नने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे शिलेदार सुनील शेळकेंची डोकेदुखी वाढली आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी सुनील शेळकेंनी केलेल्या एका वक्तव्यानंतर आता बंडखोर बापू भेगडे संतापल्याचं दिसून आलं आहे. धनगर गेले आणि मेंढरे राहिली असं वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळके यांनी करून धनगर समाजाचा अपमान केला आहे. भाष्य करताना शेळके नको ते बोलून गेले. धनगर आणि मेंढळाच्या कळपाचे उदाहरण शेळकेंनी दिलं. मावळचे खासदार श्रीरंग बारणेंसमोर शेळकेंनी हे वक्तव्य केलं आहे. आपल्या समर्थकांना दिलेली उपमा ऐकून बंडखोर बापू भेगडे चांगलेच संतापले आहेत. शेळकेंनी धनगर बांधवांचा अपमान केला. आता धनगर समाजाच्या काठीचा फटका पडल्यावरच शेळके जाग्यावर येतील. असा पलटवार बापू भेगडेंनी केला. यातून शेळके जातीभेद करत असल्याचा आरोप भेगडेंनी यावेळी केला. निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी ही भेगडेंनी सुरु केली आहे.
नेमकं काय म्हणालेत बापू भेगडे?
बापू भेगडे याबाबत बोलताना म्हणाले, सुनील शेळके यांनी खूप वाईट विधान केलेले आहे. खरंतर त्यांनी असं विधान केलं धनगर गेले आणि मेंढरं राहिली याचा अर्थ काय होतो. हा आमच्या धनगर समाजाचा अपमान आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अपमान आहे. ज्या दिवशी या धनगर समाजाच्या असणाऱ्या काठीचा फटका त्यांना पडेल त्यावेळेस ते जागेवर येतील कारण की अशा वृत्तीच्या माणसाची एकच गोष्ट लक्षात येते तो जातीभेद करतो. ही बाब राज्यासाठी आणि देशासाठी अपमानास्पद आहे. या गोष्टीसाठी राष्ट्र भांडतो आहे ज्या गोष्टीसाठी आपले सर्व नेते मंडळी भांडतात समाजकारण राजकारण करणारे मंडळ भांडतात त्याचा विचार प्रसार एकतेच्या माध्यमातून उभा राहतो.
आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ते मेंढरं म्हणाले, उपमा देत असताना त्यांनी विचार केला नाही. हा माझा परिवार आहे, प्रवाह वेगवेगळा असेल पण आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत. याचा त्यांना भान राहत नाही स्वार्थासाठी काही बोलून जातात ते याबाबत मी कायदेशीर रित्या माहिती घेईन आणि त्यानंतर मी निवडणूक अधिकारी यांच्याजवळ सुनील शेळके यांची तक्रार करेल हा संविधानाचा अपमान आहे. मी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो भविष्यात अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यांनी एकत्र यावं असं मी आवाहन करतो असे पुढे बापू भेगडे यांनी म्हटले आहे.
मावळात बंडखोरी, सुनील शेळकेंच्या अडचणी वाढल्या
मावळ मतदारसंघात बापू भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात थेट लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीकडून सुनील शेळकेंना तिकीट दिल्यानंतर बापू भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला.
स्थानिक भाजप आणि इतर पक्षांनी सुनील शेळकेंना विरोध करत बापू भेगडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. जवळपास सर्वपक्षीयांनी बापू भेगडे यांनी पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीने देखील मावळ मतदारसंघात बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बाळा भेगडे यांना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापू भेगडेविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके अशी लढत होणार आहे.