पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत. त्यावेळी बोलताना शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 'मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या', असं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यावर पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. 


त्यांना आम्ही राजकारणातून निवृत्त होऊ देणार नाही....


यावेळी बोलताना म्हणाले, 'संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण, त्यांना आम्ही राजकारणातून निवृत्त होऊ देणार नाही. त्यांच्या पुतण्याची जी इच्छा होती त्यांनी राजकारणातूनच निघून जावं. ती आम्हीच थांबवली याच्यापुढेही आम्हीच त्यांना थांबवू. त्यांना राजकारणातून निवृत्त होऊ देणार नाही. यापुढे ते कोणतीही निवडणूक लढणार नाही यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद निवडणूक लढवणार नाहीत ही वेगळी गोष्ट आहे. संसदीय राजकारण ही वेगळी गोष्ट आहे. पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारतातली, महाराष्ट्रातली धर्मनिरपेक्षता जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी शरद पवारांची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. 


आधीचा निवृत्तीचा निर्णय दबावाखाली


मागील वेळी शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते तशी घोषणा केली होती. तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांच्यावर (शरद पवार) जोर जबरदस्ती करून त्यांच्याकडून हे वाक्य उद्गारून घेतलेलं होतं. त्यावेळचा सीन बघा कसा होता. जे आज पक्षातून बाहेर पडले ते शरद पवारांना घेराव करून बसले होते त्यांच्या भोवती बसले होते, ते तेव्हा कार्यकर्त्यांना बोलू देखील देत नव्हते. ए गप बस रे मध्ये बोलू नको असं म्हणत होते, असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.


गेल्या वेळीची निवृत्तीची घोषणा ही दबावाखाली होती का? या प्रश्नावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, नक्कीच 100 टक्के ती निवृत्ती दबावाखाली घेतलेली होती.


संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्यामागचे कारण काय असेल यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांना नवीन मुलांना राजकारणात वरती आणावं वाटत असेल दिल्लीत पाठवावं वाटत असेल. दिल्लीचा राजकारण त्यांनी समजून घेऊन कारण का दिल्लीत लढण्याची आता फार गरज आहे. लढणाऱ्यांची फार गरज आहे. कधीकधी विचारधारा जपायची म्हणजे फक्त बोलून जपायची नसते तर त्या विचाराने लढून जपावी लागेल असेही जितेंद्र आव्हाड पुढे म्हणालेत. पण राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी सक्रिय राहावं. कारण ती काळाची गरज आहे असेही आव्हाड पुढे म्हणाले आहेत.