श्रीवर्धन - राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असली, पक्ष मोठी तयारी करत आहेत. अशात महाविकास आघाडीमध्ये श्रीवर्धन मतदारसंघात बिघाडी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मतदारसंघात कॉंग्रसने वेगळी भूमिका घेतली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांचा प्रचार करणार नसून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजा ठाकूर यांचा प्रचार करणार असल्याचे श्रीवर्धन मतदार संघातील पाच तालुक्यातील काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या तुतारी कडून लढणारे अनिल नवगने यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही मतदार संघात काँग्रेसला उमेदवारी मिळाली नसल्याने काँग्रेसचा अनेक कार्यकर्त्यांनी मागील आठवड्यात आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले होते. श्रीवर्धन मतदार संघात शरद पवार गटाचे अस्तित्व नसताना देखील हा मतदार संघ शरद पवार गटाला सोडला जातो, याची खंत असल्याने आम्ही हा उठाव करत असल्याचे या तालुका अध्यक्ष यांनी सांगितले आहे.
रायगडमध्ये आर.पी.आय गट पेणच्या रवी पाटील यांच्यावर नाराज
महायुती सोबत घटक पक्ष असलेल्या आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पेण विधानसभा मतदार संघातील उमेदवार रवींद्र पाटील हे विश्वासात घेत नसल्याचा आरोप आर.पी.आय. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे रवींद्र पाटील यांचं काम करणार नसल्याची भूमिका जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी घेतली आहे. रवींद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सुध्दा आम्हाला विश्वासात न घेता वयक्तिक अर्ज दाखल केला शिवाय प्रचाराला सुध्दा आम्हाला सोबत घेत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांचे काम करणार नाही .
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात तटकरेंचा मोठा प्रमाणावर प्रभाव आहे. या भागामध्ये आदिती तटकरे, अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांचा मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क असल्यामुळे आदिती तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक बऱ्यापैकी सोपी असल्याचं मानल जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांना देखील मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. शिवाय कृष्णा कोबनाक यांचे नाव या मतदारसंघात घेतले जाते. ते 25 वर्षे शिवसेनेत काम करत होते. नंतर भाजपमधून त्यांनी निवडणूक लढवली होती.
गावा-गावात त्यांना ओळखणारे लोक आहेत, ही कोबनाक यांच्यासाठी जमेची बाजू आहे. काँग्रेसचे राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ मधुकर ठाकूर यांनीही येथून अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशातच काँग्रेस या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणार असल्याने महाविकास आघाडीचे अनिल नवगने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.