गुहागर: आज विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील, त्याआधी राजकीय पक्षांनी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुहागरमधील सभेमध्ये केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भाकरी करपली ती फिरवण्याची वेळ आली असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सरकार बदला असे सांगायचे आहे. आता यावेळी महाविकास आघाडीला सत्तेत आणा असं त्यांना म्हणायचं असेल, असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणालेत भास्कर जाधव?


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आले, ते बोलताना असं म्हणाले आंब्याच्या आडीमध्ये एक आंबा नासला तर तो पूर्ण आडी नासवतो. त्यावर पत्रकारांनी मला प्रश्न विचारले, मी त्यांना उत्तर देताना म्हटलं, अरे बाबा त्यांनी माझं नाव घेतलेलं नाही. ते मला असं बोललेले नाहीत. ते जेव्हा हे बोलले तेव्हा त्यांच्या बाजूला माजी आमदार विनय नातू बसले होते. ते बोलताना विनय नातू यांच्याकडे बघत होते. एकनाथ शिंदे असं मला बोलले नाही समजून घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विनय नातू यांनाच बोलले. का बोलले तर त्यांना माहित आहे. हे विनय नातू 1992 मध्ये पडले होते, बाकीचे निवडून आले आणि हे पडले नवीन पिढीला याबाबत माहीत नाही आणि मग तात्या वारल्यानंतर यांना उभं केलं. ते जिल्हा परिषदमध्ये पडले होते, शिवसैनिकांच्या बळावर ते त्या निवडणुकीत निवडून आले. हे 1995 मध्ये शिवसेनेच्या बळावर निवडून आले. हे 1999 मध्ये देखील शिवसेनेच्या बळावर निवडून आले. 2004 मध्ये देखील शिवसेनेच्या बळावर निवडून आले तुम्ही चार वेळा शिवसेनेचे जिवावर निवडून आलेला आहात.


त्या शिवसैनिकांना पंचायत समितीचे उपसभापती पद पाहिजे होतं. प्रभाकर शिर्के धावत होते मागे-मागे साधं शिवसेनेला उप सभापतीपद दिलं नाही. त्याच शिवसेनेच्या जीवावर तुम्ही चार वेळा निवडून आला आहात. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांना शिवसेना प्रमुखांनी उमेदवारी दिली. हे अपक्ष उभे राहिले. मग नासका आंबा कोण हे त्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. 


2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती होती. तेव्हा मी तेव्हा मी निवडणूक लढवत होतो. त्यावेळी नातूंनी माझं काम केलं का त्यांना किती फोन केले. काही ठराविकच लोकांनी माझं त्यावेळी काम केलं असेल. पण, या विनय नातू यांनी काही काम केलं नाही. पण हे युतीचा धर्म सांगतात, यांना फक्त स्वार्थाचा धर्म माहिती आहे. युतीचा धर्म यांना माहिती नाही. यांनी मेसेज केला कमळ समजून घड्याळाचा बटन दाबा. तेव्हा युती असताना देखील त्यावेळी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत होते की नाही त्यामुळे आज ते नातू यांच्यासोबत असल्यामुळे ते त्यांना डायरेक्ट काही बोलू शकत नाहीत.


हा नासका आंबा आहे. ते मला बोलले नाहीत ते विनय नातू यांनाच बोललेत. दुसरं काय बोलले तर भाकरी करपली भाकरी फिरवायला हवी त्यावर भास्कर जाधव म्हणाले, भाकरी करपली भाकरी फिरवायला हवी याचा अर्थ आता जे सरकार आहे त्याला बदलायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. जे आता सरकार आहे, त्याला बदलायला पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदेंना कळून चुकलं आहे. आपण शिवसेनेचे गद्दारी करून भाजपाबरोबर गेलो भाजप हा काही विश्वासाचा पक्ष नाही. आमच्या देखात सांगतात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पुढचा मुख्यमंत्री 2019 मध्ये फक्त आमचा पक्ष सत्तेत आणणार त्यामुळे एकनाथ शिंदे सांगू शकत नाहीत. सरकार बदला त्यांनी तुम्हाला इशारा केला की, भाकरी करपली ती पलटा म्हणजे महायुती घालवा आणि महाविकास आघाडीचा सरकार आणा असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असल्याचं भास्कर जाधव यावेळी बोलताना म्हणालेत.


नक्कल करायला पण अक्कल लागते.. 


नक्कल करायला पण अक्कल लागते या एकनाथ शिंदे यांच्या टीकेला भास्कर जाधव उत्तर देताना म्हणाले, मी नकलाकार पण आणि कामाचा माणूस पण असल्यामुळे गुहागरची जनता पुन्हा एकदा मला निवडून देईल असा मला विश्वास आहे. प्रचाराचा सांगता सभेमध्ये भास्कर जाधव यांची विरोधकांवर चौफेर टीका केली. नक्कल करायला पण अक्कल लागते एकनाथ शिंदे यांच्या टीकेला भास्कर जाधव यांनी उत्तर दिलं आहे. तर डॉक्टर विनय नातू यांच्या साडी वाटपावरून भास्कर जाधव यांनी  बावनकुळे यांचा व्हिडिओ दाखवत टीका केली आहे.