पुणे : पोर्शे प्रकरणावरून बदनामी करू नये, यासाठी वडगाव शेरीचे  (Vadgaon Sheri) विद्यमान आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी सर्वच राजकीय पक्षांना नोटीस पाठवली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीच्या सभेत याचा खुलासा केला होता. चक्क सुनील टिंगरे यांनी शरद पवारांनाच नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. ही बाब समोर आल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती. त्यानंतर आता वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला आता जनताच जागा दाखवेल, असे बापू पठारे यांनी म्हटलंय. 


विश्रांतवाडी येथील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बापू पठारे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना बापू पठारे म्हणाले, पात्रता नसतानाही त्यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली. आता वडगाव शेरीतील नागरिकच त्यांना त्यांची पात्रता दाखवून देतील. शरद पवार ईडीच्या नोटिसीला देखील घाबरले नाहीत. त्यामुळे एखादा चिल्लर आमदार जर त्यांना नोटीस पाठवत असेल तर जनताच त्यांना जागा दाखवेल. 


दरम्यान, दरम्यान आमदार सुनील टिंगरे त्यांच्या दादागिरीला परिसरातील नागरिक घाबरले आहेत. कुणीही समोर येऊन बोलण्यास तयार नाही. त्यांच्या या दादागिरीला कंटाळल्याने संपूर्ण टिंगरे कंपनी आणि गाव माझ्यासोबत आहे. रेखा टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात केलाय आणि त्या आता त्यांच्या भागातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळवून देतील. आमदार टिंगरेंच्याच भागातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचं निकालाच्या दिवशी कळेल, असाही विश्वास बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केलाय.


भाजपच्या माजी नगरसेविकेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 


पॉर्श प्रकरणात अडकलेल्या आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला आहे. वडगाव शेरीतील भाजपच्या माजी नगरसेविकेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोदी बागेत दाखल झाले आणि त्यांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे देखील यांच्यासोबत उपस्थित होते. या प्रवेशाने आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला. मतदारसंघातील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या रेखा टिंगरे यांची भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने सुनिल टिंगरेंना ऐन निवडणुकीच्या दिवसात मोठा धक्का बसलाय.