मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या 288 इतकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबरला राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा अस्तित्त्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील 288 जागांवर एकाच दिवशी मतदान पार पडेल. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्व राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.


उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या दिवसांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काही पात्रतेच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.   


विधानसभा सदस्य होण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते?


देशातील कोणत्याही राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास संबंधित व्यक्ती प्रथम भारताचाची नागरिक असली पाहिजे. याशिवाय त्यानं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची किमान 25 वर्षे पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. भारताच्या संसदेनं वेळोवेळी केलेल्या कायद्यांद्वारे निश्चित करण्यात आलेल्या अटी त्यांनी पूर्ण करणं आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती भ्रष्टाचाराच्या आरोपात किंवा इतर कोणत्याही गुन्ह्यात दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेली असल्यास विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करता येत नाही.  


विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती?


महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 40 लाख रुपयांची मर्यादा ठेवली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 40 लाखांपेक्षा अधिक रक्कम प्रचारावर खर्च करता येणार नाही.


महाराष्ट्राच्या विधानसभेची रचना


महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या 288 इतकी आहे. एसटी प्रवर्गासाठी 25 जागा राखीव आहेत.एससी प्रवर्गासाठी 29 जागा राखीव आहेत. तर, 234 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना 2009 मध्ये झाली होती. 


निवडणूक कार्यक्रम :


निवडणुकीचं नोटिफिकेशन:  22 ऑक्टोबर 2024


अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 


अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024


अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 


मतदान  :20 नोव्हेंबर 2024


मतमोजणी :  23 नोव्हेंबर  2024


निवडणूक प्रक्रिया समाप्त:  25 नोव्हेंबर  2024


दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यास पाच दिवसांचा कालावधी उरला असला तरी राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या जागावाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. मविआ आणि महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा येत्या एक दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


इतर बातम्या :


मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप