Cabinet Reshuffle | राज्य मंत्रिमंडळात जूनच्या सुरुवातीला फेरबदलाचे संकेत
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2019 04:44 PM (IST)
लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
फोटो : गेट्टी इमेज
मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा अनुमान वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही 'आयाराम' नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हं आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांनाही शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. Vikhe family disputes | विखे कुटुंबातील लढाई पुन्हा रस्त्यावर | अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील दोन नंबरच्या मंत्रिपदाची म्हणजेच महसूल खात्याची मागणी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महसूल खातं काढून विखेंना मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातं. मात्र पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेलं आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेलं कृषी खातं विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे.