Pune Bypoll election : पुण्यातील कसबा विधानसभा (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीकडून भाजपच्या विरोधात तगडं आव्हान उभं करण्यात आल्यानं भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावायचं ठरवलं आहे. त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) हे 26 तारखेपर्यंत म्हणजे निवडणूक होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून असणार आहेत. आज बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिवसभर कसबा मतदारसंघात (Kasba Peth Assembly Constituency) प्रचार करणार आहेत. तर 18 आणि 19 तारखेला स्वतः अमित शाह पुण्यात असणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या प्रचाराच्या सभाही पुण्यात होणार आहेत.
कसब्यात मागील चाळीस वर्ष भाजपची सत्ता होती. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय कसब्यात आतापर्यंत ब्राह्मण समाजाचा उमेदवार उभा राहायचा, त्यामुळे कसब्यात भाजपची सत्ता असायची. यावेळी उमेदवार ब्राह्मण समाजाचा नाही. त्यामुळे भाजपला पारडं जड करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांनी प्राचाराचं योग्य नियोजन केलं आहे. त्यात भाजपचे अनेक दिग्गज नेते नागरिकांना साद घालण्यासाठी पुण्यात येणार आहे.
मनसे देणार भाजपला पाठिंबा
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपला पाठींबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची भूमीका जाहीर केल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्यामुळेच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटलं असल्याचं वागस्कर यांनी सांगितलं आहे.
महाविकास आघाडीची पहिली सभा जोरात...
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचार सभादेखील दणक्यात पार पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी कसब्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत पहिली प्रचार सभा झाली त्यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बेरोजगारी आणि तरुणाच्या प्रश्नांना समोर ठेवून यंदा महाविकास आघाडी निवडणुकीत उतरली आहे. प्रचाराला काहीच दिवस उरले आहेत. त्यात आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अजित पवार आणि अशोक चव्हाण कसब्यात प्रचार करत आहे. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांचे आयोजन करण्याचाही प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :